मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आमदारांनी आज विधिमंडळ परिसरात निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधले.
गेल्या सहा दिवसापासून सिंचनावरून एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणारे सत्ता आणि विरोधी पक्षाचे नेते आज मराठा समाजाला आरक्षण मिळावे यावरून एकत्र आले होते. सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायरीवर घोषणा देत सरकारचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना विनायक मेटे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटना एकत्र येऊन त्यांनी मराठा समन्वय समितीची स्थापना केली. या समितीमध्ये विविध पक्षाचे नेत्यांचा सभाग आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा कुठल्याही एका पक्षाचा नसून तो समाजाचा आहे. समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळत नाही. समाजामध्ये गोरगरीब लोक असून त्यांच्यामध्ये आज असंतोष आहे.
यापूर्वी समाजासाठी अनेक आंदोलने झाली. मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्यात आली मात्र निर्णय घेण्यात आला नाही. अधिवेशनाला तीन दिवसांचा कालावधी असून आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी समाजाला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. सभागृहात या विषयावर चर्चा झाली नाही तर समाजातील आमदार सभागृहातील कामकाज बंद पाडतील, अशा इशारा मेटे यांनी दिला. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक तयार व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मनसेचे बाळा नांदगावकर, जितेंद्र आव्हाड, भरत गोगावले, महादेव बाबर, रमेश थोरात, भीमराव तपकीर, राजेंग्र शिंगणे, अनिल भोसले, प्रवीण दरेकर, सतीश चव्हाण आदी आमदार उपस्थित होते.