News Flash

दिग्गज नेत्यांच्या सभांसाठी सर्व पक्षांचे प्रयत्न

ताटातुटीनंतर विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून प्रचारास अतिशय अल्प कालावधी असल्याने विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करताना स्थानिक पदाधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक

| September 30, 2014 07:45 am

ताटातुटीनंतर विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून प्रचारास अतिशय अल्प कालावधी असल्याने विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करताना स्थानिक पदाधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. जाहीर सभा गाजविणारे राज्यासह देशातील अनेक दिग्गज नेते प्रचाराच्या निमित्ताने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात दाखल होत असून त्या अनुषंगाने नियोजनाला सर्वपक्षीय यंत्रणा कामास लागली आहे. भाजपने नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तर काँग्रेसने पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची सभा आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात येत असताना महायुती आणि आघाडीने काडीमोड घेतल्याने सर्वच समीकरणे बदलली. प्रत्येक पक्ष स्वबळावर मैदानात उतरल्याने आधी एकत्रित सभांचे आयोजन करणाऱ्यांना आता स्वतंत्रपणे सभा घेण्याचे आव्हान पेलावे लागत आहे. माघारीच्या मुदतीनंतर प्रचारासाठी केवळ अकरा ते बारा दिवसांचा कालावधी असल्याने सर्वच धास्तावले आहेत. यामुळे सर्वच उमेदवारांनी प्रचार फेरी व भेटीगाठीद्वारे प्रचारास सुरूवात केली आहे. निवडणुकीत खरा रंग भरला जातो, तो जाहीर सभांमुळे. उत्तर महाराष्ट्रातील ३५ विधानसभा मतदारसंघात जाहीर सभांची सुरूवात करण्यात भाजप व राष्ट्रवादीने आघाडी घेतली. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नंदुरबार, जळगाव व नाशिक जिल्ह्यात सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची मंगळवारी तर गडकरी यांची पुन्हा चार ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा घेण्यात येणार असली तरी अद्याप सभेची तारीख निश्चित झालेली नाही. पंतप्रधानांसह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात प्रमुख नेत्यांच्या किमान दोन सभा व्हाव्यात, असा भाजपचा प्रयत्न असल्याचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी सांगितले. रिपाइंला काही जागा मिळाल्याने रामदास आठवले यांच्या सभा वेगवेगळ्या मतदारसंघात होऊ शकतील.
आघाडीत ताटातूट होण्याआधीच राष्ट्रवादीने मालेगाव शहरातून आपल्या प्रचारास सुरुवात केली. पुढील काळात शरद पवार यांच्यासह अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, आर. आर. पाटील, तारीक अन्वर, छगन भुजबळ, नवाब मलीक आदी नेत्यांच्या सभांची मागणी करण्यात आली आहे. प्रदेश कार्यालयाकडून सभांच्या तारखा लवकरच निश्चित होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी सांगितले. काँग्रेसकडूनही राज्यासह दिल्लीतील महत्वपूर्ण नेत्यांना बोलविण्याचा प्रयत्न आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, बाळासाहेब थोरात यांच्या सभा व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रदेश कार्यालयाकडून सभा व तारखांची निश्चिती केली जात असल्याचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी सांगितले.
शिवसेना व मनसे हे पक्ष म्हणजे एकखांबी तंबू. त्यांची संपूर्ण दारोमदार अनुक्रमे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांच्यावर असल्याचे लक्षात येते. भाजपने ऐनवेळी साथ सोडल्याने शिवसेना नेत्यांना अल्पावधीत संपूर्ण राज्यभरात सभांचा बार उडवून देण्यास मर्यादा येणार आहेत. यामुळे सेनेने दुसऱ्या फळीतील नेत्यांना सक्रियपणे प्रचारात उतरविण्याचे ठरविले आहे. या अनुषंगाने खा. संजय राऊत, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम, माजी आमदार गुलाबराव पाटील, अभिनेता अमोल कोल्हे यांच्या सभा होणार आहेत. आदित्य ठाकरे यांचा नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात ‘रोड शो’ होणार असल्याचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगितले. सेनेच्या प्रचाराला असे विविधांगी पदर असतील. उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा १० ऑक्टोबरला हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होईल. उर्वरित नेत्यांच्या सभांच्या तारखा निश्चितीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची धडाडणारी तोफ नाशिकला नवीन नाही. प्रत्येक निवडणुकीत दोन ते तीन दिवस मुक्काम ठोकून ते सभांचा धडाका लावून वातावरण ढवळून काढतात. विधानसभा निवडणुकीत त्याच धाटणीने शहर व ग्रामीण भागात राज यांच्या सभा होतील, असे पक्षाच्या प्रवक्त्या शर्वरी लथ यांच्याकडून सांगण्यात आले. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर त्यांची एक सभा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राज यांची सभा व्हावी अशी उमेदवारांची मागणी आहे. संपूर्ण राज्यातील वेळापत्रकानुसार नाशिकला किती सभा होतील याची निश्चिती करण्याचे काम सुरू आहे. बसपतर्फे मायावती यांची जाहीर सभा आठ ऑक्टोबरला नाशिकरोडच्या मैदानावर होणार आहे. याशिवाय, माकपचे नेतेही प्रचारात उतरले असून वृंदा करात यांची सभा आठ ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर ११ तारखेला खा. जितेंद्र चौधरी व माजी खासदार हनन मुल्ला यांची सभा होणार आहे. अशोक ढवळे व अजित अभ्यंकर हे राज्यातील नेतेही प्रचारात सहभागी होणार आहेत.

हुतात्मा कान्हेरे मैदानाचे आव्हान कोण पेलणार ?
शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे हुतात्मा अनंत कान्हेरे हे जाहीर सभेसाठी अतिशय महत्वपूर्ण मैदान. सुमारे लाखभर प्रेक्षक क्षमता असणाऱ्या या मैदानावरील जाहीर सभा निवडणुकीचे वारे पलटविण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे या मैदानावर जो पक्ष सभा आयोजित करतो. त्याच्यासमोर मैदान भरण्याइतपत गर्दी जमविण्याचे आव्हान असते. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी या मैदानाची निवड केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसेचे राज ठाकेर यांची जाहीर सभा याच मैदानावर होईल. या मैदानावर सभा घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष उत्सुक असून त्यात गर्दीचा उच्चांक कोण मोडणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 7:45 am

Web Title: all political parties trying for star campaigners rally in maharashtra
Next Stories
1 ‘दुर्गावतारासमोर’ वीज कंपनीची माघार
2 नेत्यांनी रात्रीत पक्ष बदलल्याने कार्यकर्ते संभ्रमित
3 प्रशासकीय अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना अटक
Just Now!
X