भ्रष्टाचाराचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीची संपत्ती सरकारने जप्त करावी, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. लाचखोर चिखलीकरची काही संपत्ती औरंगाबाद येथेही होती. त्याच्या नातेवाइकाच्या नावे असणाऱ्या संपत्तीचा उल्लेख तपास यंत्रणेने अजून केला नाही. त्यामुळे कारवाई झाली असली तरी ती शंभर टक्के परिपूर्ण आहे, असे म्हणता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचार संपविण्यासाठी भ्रष्ट व्यक्तीच्या संपत्तीवर टाच आणली जायला हवी. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. सरकारने त्यांचे नाव परभणी कृषी विद्यापीठाला देण्याचा ठराव पूर्वीच केला होता. मात्र त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, त्याची आठवण करून देण्यासाठी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बंजारा वेशातील महिला या मोर्चात सहभागी झाल्या. सरकारने परभणी कृषी विद्यापीठास तातडीने वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे, अशी मागणी करणारे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले. मोर्चात कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.