मध्य रेल्वेच्या विविध मार्गावरील फुकटय़ा प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारणारे तिकीट तपासनीस मर्यादित संख्या, कमकुवत सुरक्षा व्यवस्था, वाढलेले लक्ष्य आणि फुकटय़ा प्रवाशांकडून होणारे हल्ले यामुळे हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनही या हल्ल्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या असंतोषात भर पडली आहे. रेल्वेच्या वतीने तिकिटाची व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली असून, स्थानकामधील तिकीट वितरण खिडक्या, ऑनलाइन तिकीट वितरण, एटीएम, सीव्हीएम, जनसाधारण तिकीट खिडक्या अशा मोठय़ा संख्येने तिकीट विक्रीची प्रणाली अधिक सक्षम करण्यात आली असली तरी त्या तुलनेत तिकीट तपासनीसांच्या संख्येत मात्र वाढ झालेली नाही. त्यामुळे कामाचा प्रचंड ताण तिकीट तपासनीसांवर असताना आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला असल्यामुळे निषेध मोर्चासारखे प्रयत्न करून आपल्या समस्यांकडे लक्ष वेधवावे लागत आहे.
मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गावरून दररोज सुमारे ७० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असून ही संख्या भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवाशांच्या निम्म्याहून अधिक आहे. साहजिकच येथून मिळणारे उत्पन्नही खूप मोठे आहे. त्यातूनही केवळ मध्य रेल्वेच्या मार्गावर ४० लाखांहून अधिक प्रवासी असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी केवळ ४५० च्या आसपास तिकीट तपासनीस आहेत. सध्या मोठय़ा स्थानकावर एका शिफ्टमध्ये पाच ते सहा तिकीट तपासनीस असतात, तर छोटय़ा स्थानकांवर त्यांचे प्रमाण अत्यल्प असते. सीएसटी, दादर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकांवर टी.सी. जास्त असले तरी छोटय़ा स्थानकांवर हे प्रमाण कमी असते. विशेष म्हणजे कल्याण- कर्जत मार्गावर तिकीट तपासनीस कार्यरतच नसल्याची धक्कादायक माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या मेल गाडय़ांमध्ये तीन कोचसाठी १ तिकीट तपासनीस अशी व्यवस्था असणे गरजेचे असताना, लांब पल्ल्याच्या गाडय़ा केवळ दोन ते तीन तिकीट तपासनीसांच्या आधारावर धावतात. त्यामुळे गाडय़ांमध्ये फुकटय़ा प्रवाशांचा उपद्रव वाढला आहे.
कर्मचारी असुरक्षित..
ठाणे तसेच त्या पलीकडच्या स्थानकांमध्ये गर्दीमुळे प्रवासी हिंसक होत असून, पोलिसांचा वचक नसल्याने प्रवासी जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. त्याचा फटका रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनाही बसत असून बुधवारी ठाणे स्थानकात रेल्वे तिकीट तपासनीसाला मारहाण झाल्याच्या घटनेतून हे उघड झाले आहे. अनेक घटनांमध्ये कर्मचारी जखमी होत असताना त्यांना अधिकाऱ्यांचे कोणतेच पाठबळ मिळत नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढू लागली असून, त्यावर वचक बसवण्याची गरज असल्याचे मत सेंट्रल मजदूर संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.
प्रत्येक कर्मचाऱ्यास संरक्षण देणे अशक्य
तिकीट तपासनीसांची संख्या मर्यादित असून काही वेळा प्रवाशांशी हुज्जत घालण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढावतो, मात्र अशा प्रसंगी रेल्वे कर्मचाऱ्यांनी पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाची मदत घेणे गरजेचे आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला संरक्षण देणे रेल्वेला शक्य नसून प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.
अतुल राणे, रेल्वे जनसंपर्क अधिकारी
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2014 रोजी प्रकाशित
आधीच अपुरे त्यात असुरक्षित..
मध्य रेल्वेच्या विविध मार्गावरील फुकटय़ा प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारणारे तिकीट तपासनीस मर्यादित संख्या, कमकुवत सुरक्षा व्यवस्था, वाढलेले लक्ष्य आणि फुकटय़ा प्रवाशांकडून होणारे हल्ले यामुळे हवालदिल झाले आहेत.
First published on: 21-02-2014 at 01:53 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on railway tc