रोजच्या मिळकतीतील काही रक्कम वेगळी काढून तीच दिवाळीला बोनस म्हणून स्वीकारणाऱ्या बदलापूरमधील रिक्षाचालकांनी राज्यभरातील रिक्षाचालकांपुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे गेली दहा वर्षे शहराच्या पूर्व विभागातील रिक्षाचालक या योजनेत भाग घेऊन आपल्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात साजरी करीत आहेत. यंदा या योजनेतून २५६ रिक्षाचालकांमध्ये १४ लाख २० हजार रुपयांचे बोनस वाटप करण्यात आले.
 शहरातील परिवहनाचा आधारस्तंभ असूनही रिक्षाचालकांना दिवाळीला बोनस, सानुग्रह अनुदान असे काही मिळत नाही. इतर सेवा पुरविणाऱ्यांना ग्राहक आठवणीने दिवाळी भेटी देतात. रिक्षाचालकांना अशा कोणत्याही भेटवस्तू मिळत नाहीत. रिक्षाचालकांच्या मनात याबद्दल कुठेतरी खंत असते. त्यावर उपाय म्हणून बदलापूर पूर्व विभाग रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश खिलारे यांनी दहा वर्षांपूर्वी ही अभिनव संकल्पना राबवली. पहिल्या वर्षी फक्त १८ रिक्षाचालकांनी या योजनेत भाग घेतला. त्यातून २१ हजार रुपयांचे बोनस वाटप झाले. दिवसेंदिवस या योजनेला रिक्षाचालकांचा वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे. सुखदेव अहिरे या रिक्षाचालकाने सतत गेली तीन वर्षे सर्वाधिक बोनस मिळविला. यंदा त्यांना त्यांनीच वर्षभर साठविलेले ४१ हजार ८०० रुपये मिळाले. सुभाष पाटील यांना ३८ हजार रुपये तर रामू राऊत यांना १९ हजार रुपये मिळाले. यंदा दहावे वर्ष असल्याने सर्व सभासदांना बोनससोबत भेटवस्तू आणि कुपन देण्यात येणार आहे. या कुपन्समधून नऊ भाग्यवान विजेत्यांना साडी भेट देण्यात येणार आहे. पगाराची पावती नसल्याने दुकानदार रिक्षाचालकांना हप्त्यावर वस्तू देत नाहीत, मात्र आता बदलापूरमध्ये संघटनेच्या हमीवर रिक्षाचालकांनाही दुकानदार हप्त्याने टी.व्ही., फ्रिज, वॉशिंग मशिन्स आदी वस्तू देऊ लागले असल्याची माहिती खिलारे यांनी दिली.