गोवंडीतील आनंदनगरमधील संजीवनी सोसायटीखालची जलवाहिनी अचानक फुटून झालेल्या हाहाकारामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला. भूगर्भातून अचानक पाणी कसे आले, असा प्रश्न तेव्हा तळमजल्यावरील रहिवाशांना पडला होता. परंतु या इमारतीखाली जलवाहिनी असून त्यावरच बांधकाम केले जात आहे, अशी स्पष्ट तक्रार करण्यात येऊनही सरकारी अधिकारी आणि बिल्डर यांच्या संगनमताने त्याकडे दुर्लक्ष केले गेले, अशी माहिती आता पुढे येत आहे.
या इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच २००६ साली इमारतीखालून जलवाहिनी गेल्याबाबत आपण पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. पण पालिका व एसआरए आधिकारी आणि बिल्डर यांचे संगनमत असल्याने आमच्या तक्रारींना केराचीच टोपली दाखविण्यात आल्याचे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संभाजी लोखंडे यांनी सांगितले. त्यामुळे या दुर्घटनेतील सर्व पीडितांना भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
२००३मध्ये संजीवनी को-ऑप.सोसायटीची स्थापना करून पुर्नविकासाच्या प्रकल्पा अंतर्गत सात मजली इमारत उभारण्यात आली. याच इमारतीखालील २४ इंची पाण्याची जलवाहिनी सोमवारी पहाटे हजारे यांच्या घरात फुटली. ऐन साखर झोपेच्या वेळी एकदम घरात पाणी-पाणी झाल्याने आणि पाण्याचे फवारे उडू लागल्याने काहीच समजत नव्हते. झोपलेले लोक उठेपर्यंत आणि त्यांना बाहेर काढेपर्यंत त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले. यामुळेच आपले वडील देवीसिंग हजारे यांचा मृत्यू झाल्याचे विश्वनाथ हजारे यांनी सांगितले. तर पाच वर्षांची दोन्ही डोळ्यांनी अपंग असणारी पुतणीही यामध्ये बुडाल्याने तिच्यावरही शताब्दी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, असे हजारे यांनी सांगितले. या अपघातामुळे ही इमारत खचली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये राहण्यास आता आम्हाला भीती वाटत असल्याचे स्थानिक रहिवाशी कांचन माने यांनी           सांगितले.