News Flash

स्वपक्षीयांची दगाबाजी टाळण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्तेही सज्ज

राजकारणात कधी कोणाचे नसते, असे बोलले जात असले तरी ते तितकचे खरे आहे आणि याचा प्रत्यय गेल्या काही वर्षांत विविध राजकीय पक्षांमध्ये दिसून आला आहे.

| April 2, 2014 10:05 am

स्वपक्षीयांची दगाबाजी टाळण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्तेही सज्ज

राजकारणात कधी कोणाचे नसते, असे बोलले जात असले तरी ते तितकचे खरे आहे आणि याचा प्रत्यय गेल्या काही वर्षांत विविध राजकीय पक्षांमध्ये दिसून आला आहे. लोकसभा निवडणुकीत स्वपक्षीयांकडून दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांना कामाला लावले आहे. काँग्रेसला काँग्रेसच पाडू शकते, हा युक्तिवाद काँग्रेसच्या नेत्यांनाही मान्य असल्याने यावेळी कोण कुठे ‘फिल्डिंग’ लावेल, याचा अंदाज घेऊन त्याला तोंड देण्यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक सज्ज झाले आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला यापूर्वी विदर्भात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसह विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जबरदस्त फटका बसला होता. स्वपक्षामधील दगाबाजीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेस नेत्यांची गेल्या काही दिवसांपासून धडपड सुरू आहे. फक्त काँग्रेसच नव्हे, तर भाजप-सेनेसह बहुतेक सर्वच पक्षात कमी-अधिक प्रमाणात गटबाजी आणि असंतोष आहे. मात्र, असंतुष्टांचा सर्वाधिक धोका काँग्रेसमध्ये आहे. पक्षाचे ज्येष्ठ निष्ठावंतही वारंवार अशा धोक्यापासून सावध राहण्याच्या सूचना करत आले आहेत. आता खरी सावधगिरी बाळगण्याची वेळ आली असल्याने ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसचे उमेदवार सावध झाले आहेत, तर उमेदवार प्रचारात गुंतले असताना आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची खलबते बंगल्यातून करण्याऐवजी उशिरा रात्री गुप्त ठिकाणी करण्यावर असंतुष्टांचा भर आहे.
विदर्भातील बहुतेक सर्वच मतदारसंघात हा धोका आहे. विलास मुत्तेमवार, प्रफुल्ल पटेल, सागर मेघे, संजय देवतळे, हिदायत पटेल, शिवाजीराव मोघे यांच्यापासून ते अगदी नवनीत राणा यांच्यापर्यंत सर्वच प्रमुख उमेदवारांनी सावध पवित्रा घेतला आहे. मतदारसंघातील नाराज नेते कोण, त्यांच्या कारवाया कशा चालतात, त्यांच्या खंद्या समर्थकांचा कल कसा आहे, कुठे फटका बसू शकतो, कोणते गट कोणाला समर्थन देऊ शकतात, त्यांच्या वजाबाकीचे गणितही काँग्रेसचे उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी केले आहे. या असंतुष्टांचे ‘पॉकेटस्’ आणि त्यावर त्यांच्या समर्थकांची असलेली पकड लक्षात घेऊन तेथील मतदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याउलट, साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून कोणाला मदत करायची, याचे आराखडे असंतुष्टांकडून बांधण्यात येत आहेत. स्वतच्या मतदारसंघात हे शक्य नसल्यास हे नेते अन्य मतदारसंघात सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत.
नागपुरात तर माजी मंत्री अनीस अहमद आणि रोहयो मंत्री नितीन राऊत व माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांनी विलास मुत्तेमवार यांच्याविरोधात गेल्या निवडणुकीत बंड पुकारले होते. यावेळी चतुर्वेदी मुत्तेमवार यांच्यासोबत सहभागी झाले असले तरी राऊत आणि अहमद मात्र अजूनही मुत्तेमवार यांच्या प्रचारापासून दूर आहेत. त्यासाठी मुत्तेमवारांनी नागपूर भेटीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मध्यस्थी करायला लावली आणि त्यांचे कान टोचण्याचे काम केले. राऊत आणि अहमद तर मुत्तेमवार यांच्या प्रचार मिरवणुकीतही सहभागी झालेले नाहीत. त्यांनी उघडपणे बंड केले नसले, तरी त्यांची अनुपस्थिती गृहित धरून मुत्तेमवार समर्थक आधीच सेफ गेम खेळत आहेत.
पक्षातील विरोधकांनी कितीही फिल्डिंग लावली तरी त्याने फरक पडणार नाही, कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत, असा दावा मुत्तेमवार समर्थक करतात. पण कोणत्याही भाषणात किंवा छोटेखानी कार्यक्रमात स्वपक्षातील विरोधकांवर टीका करण्याचे टाळतात. वध्र्यात सागर मेघे आणि चंद्रपूरमध्ये संजय देवतळे यांच्यासमोर भाजपचे आव्हान असले तरी खरे आव्हान चारुलता टोकस आणि रणजित कांबळे आणि चंद्रपूरमध्ये ज्येष्ठ नेते नरेशचंद्र पुगलिया या स्वपक्षातील नेत्यांचेच आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमुळे सर्व इच्छुक ‘काडय़ा’ करणार नाहीत, असा आशावाद खाजगीत चर्चा करताना काँग्रेसचे नेते व्यक्त करतात.
असंतुष्टांना देखील निवडणुकांना सामोरे जायचे असल्याने ‘पंजा’ला मतदान करू नका, असे कोणत्या तोंडाने ते मतदारांना सांगतील? यामुळे तसा धोका राहणार नाही, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना असला तरी काँग्रेस उमेदवारांना सावध राहण्याशिवाय पर्याय नाही, हे मात्र तितकेच खरे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2014 10:05 am

Web Title: candidates are ready to to avoid threat of own party members
Next Stories
1 गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांचा निरुत्साह
2 निवडणुकीचा ज्वर चढू लागला शहरात, ग्रामीण भागांत सर्वत्र
3 उमेदवारांची यादी लांबल्याने ‘ईव्हीएम’ आयात करण्याची वेळ
Just Now!
X