मध्य रेल्वे मार्गावर लोकल गाडय़ांचा कसा सावळागोंधळ सुरू आहे याचा ढळढळीत पुरावा पुढे आला असून गेल्या नऊ महिन्यांत वेगवेगळी कारणे पुढे करत या मार्गावर लोकल गाडय़ांच्या तब्बल साडेचार हजार फे ऱ्या रद्द झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
लोकल गाडीची एखादी फेरी जरी रद्द झाली तरी प्रवाशांचा होणारा गलका विचारात घेता विविध ठिकाणी रद्द झालेल्या या फे ऱ्यांमुळे प्रवाशांचा सहनशीलतेचा अंत पाहिला जात असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणामुळे लोकल गाडय़ांचे वेळापत्रक पाळले जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. तांत्रिक बिघाडात तर या मार्गावर विक्रम रचला गेल्याचे चित्र आहे. सकाळच्या वेळेत लोकल रद्द झाल्यामुळे डोंबिवली स्थानकात मध्यंतरी महिला प्रवाशांना रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न केला होता. यासंबंधी गेल्या नऊ महिन्यांची माहिती पुढे आली असून ती धक्कादायक आहे.
सप्टेंबर २०१३ ते मे २०१४  या कालावधीत मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर विविध रेल्वे स्थानकांच्या दरम्यान एकूण ३ हजार ५५९, जलद गती मार्गावर ७९४ लोकल गाडय़ांच्या फे ऱ्या रद्द करण्यात आल्या. जानेवारी २०१४ पासून जलद, धीम्या मार्गावर लोकल रद्द होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेल्याचे दिसते. धीम्या मार्गावर २ हजार ७०९ वेळा तर जलद मार्गावर ८०३ वेळा लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत. या कालावधीत एकूण ३ हजार २८१ वेळा लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय परिचलन कार्यालयाचे के. एन. सिंग यांनी डोंबिवलीतील एक जागरूक नागरिक विवेक पाठक यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे. मेगाब्लॉकमुळे बहुतेक वेळा या फेऱ्या रद्द झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. कर्जत, कसारा, टिटवाळा भागात मात्र गाई, म्हैशींचा कळप आडवा गेल्यामुळे गाडय़ा रद्द कराव्या लागत असल्याचे माहितीत म्हटले आहे