News Flash

चित्रगीत

मराठीत संत तुकाराम यांना बंडखोर संत मानलं जातं. उत्तरेत तेच स्थान संत कबीर यांचं आहे. त्यांचा काळही १४व्या शतकातील! हिंदू आणि मुस्लीम अशा दोन धर्मातील

| March 17, 2013 12:34 pm

ठगनी
मराठीत संत तुकाराम यांना बंडखोर संत मानलं जातं. उत्तरेत तेच स्थान संत कबीर यांचं आहे. त्यांचा काळही १४व्या शतकातील! हिंदू आणि मुस्लीम अशा दोन धर्मातील कर्मठपणा जवळून पाहिल्यानेच कदाचित त्यांच्या रचना प्रबोधनात्मक आणि बंडखोरीची भाषा करणाऱ्या आहेत. कबीरांनी संन्यास वगैरे घेतला नाही, मात्र विरक्त भावना ठायीठायी होती, त्यामुळेच त्यांच्या रचनांमध्ये सर्वसामान्यांसाठीचा उपदेश रूपके, प्रतीके आदी माध्यमांतून मार्मिकपणे पुढे येतो. या रचना एवढय़ा प्रभावी आहेत की, सांप्रत काळाशीही त्या सुसंगत ठरल्या आहेत. सारेगामा इं. लि. या कंपनीची निर्मिती असलेला ‘ठगनी’ हा नवा अल्बम याचीच प्रचीती देतो. श्रेयस-आभास या ताज्या दमाच्या गायक-संगीतकार जोडीने यातील रचना स्वरबद्ध केल्या आहेत व गायल्याही आहेत.  यात एकूण सात रचना ऐकण्यास मिळतात. कबीरांच्या रचनांची भुरळ हिंदी चित्रपटसृष्टीला प्रथमपासून असल्याने यातील अनेक रचना यापूर्वी संगीतबद्ध केल्या गेल्या आहेत. मात्र या तरुण संगीतकारांनी पूर्वसुरींच्या स्वररचनांचा बाऊ न करता त्यांना नवा साज चढविला आहे. हे दोघे फ्यूजनसाठी प्रसिद्ध असल्याने या वेळीही त्यांनी तोच मार्ग चोखाळला आहे. गिटार, मेंडोलीन, बासरी, कोंगो, ड्रम आदी बहुसंख्य पाश्चात्त्य वाद्यांच्या साहाय्याने व सुरावटीने ही गीते त्यांनी खुलविली आहेत. ‘घुंघट के पट खोल री’ या प्रसिद्ध रचनेने या अल्बमची सुरुवात होते. श्रेयस व आभास दोघांनीही अतिशय आर्ततेने ही रचना सादर केली आहे. या रचनेतील गर्भितार्थ व रूपक थक्क करणारं आहे. भा. रा. तांबे यांच्या ‘नववधू प्रिया मी बावरते’ या रचनेत ज्याप्रमाणे भक्त आणि ईश्वराचे रूपक योजण्यात आले आहे, तोच प्रकार यात आढळतो. तांबे यांच्यावर कबीरांचा प्रभाव होता की नाही, हा संशोधनाचा विषय ठरू शकेल.
‘मोको कहाँ ढुंढे रे बंदे मै तो तेरे पासमें’ या रचनेत कबीरांची बंडखोरी दिसून येते. याच्या अंतऱ्यात ते म्हणतात, ‘ना तीरथमें, ना मूरतमें, ना एकांत निवासमें, ना मंदिरमें, ना मस्जिदमें, ना काबे कैलाशमें, मै तो तेरे पासमें..! १४व्या शतकातील सनातनी परिस्थिती पाहाता अशी रचना करणे, हे मोठेच धारिष्टय़. ही रचना ऐकतानाही ‘कुठे शोधीशी रामेश्वर अन् कुठे शोधीशी काशी’ या गीताची आठवण होते. फरक इतकाच की ‘कुठे शोधीशी’मध्ये केवळ हिंदूंनाच डोस पाजण्यात आला आहे, कबीर मात्र हिंदूूंप्रमाणेच मुस्लिमांनाही उपदेश करताना दिसतात. ‘मोरा सैय्या निकस गयो, मै ना लडी थी’ ही रचनाही या दोघांनी तन्मयतेने गायली आहे. हीच रचना राज कपूरच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’मध्ये लता मंगेशकर यांच्या आवाजात ऐकायला मिळते. या चित्रपटगीतासाठी लक्ष्मी-प्यारे यांनी काहीशी तारसप्तकातील चाल लावली आहे, इथे मात्र हीच रचना वेगळ्या चालीत व खालच्या पट्टीत ऐकू येते. गंमत म्हणजे या दोन्ही रचना भावस्पर्शी वाटतात! सप्तसुरांची ही किमया थक्क करणारी.  ‘झीनी रे झीनी रे झीनी रे चदरिया, के रामनाम रस भिनी रे चदरिया’ ही रचना म्हणजे उदरनिर्वाहासाठी करावं लागणारं विणकाम आणि आध्यात्मिक दृष्टिकोन यांची उत्तम सांगड आहे. ही रचना ऐकताना ‘कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, कबीराचे विणतो दोहे..’ या आपल्या गाजलेल्या मराठी गाण्याची आठवण होते. प्रतिभावंतांवर पूर्वसुरींचा प्रभाव असल्यास संस्कृतीची गंगा अशी वाहती राहाते! ‘माया ठगनी’ ही रचनाही दाद देण्यासारखी झाली आहे, तर कुमार गंधर्वानी अजरामर केलेली ‘उड जाएगा हंस अकेला’ ही रचना वेगळ्या ढंगात समोर येते. ‘मन लागो मेरो यार’ या पहाडी रागाच्या सुरावटीतील रचनेने या अल्बमची सांगता होते. श्रेयस आणि आभासने केलेल्या या फ्यूजनमुळे तरुण पिढीच्या कानांवर खूप काही चांगलं पडेल, यात शंका नाही. सध्या त्याचीच आवश्यकता आहे!

हिम्मतवाला  
‘हिम्मतवाला’ हा चित्रपट संगीतकार भप्पी लाहिरीसाठी भाग्योदयाचाच ठरला. यातील गाणी कमालीची गाजली. जितेंद्र आणि भप्पीची सेकंड इनिंग या चित्रपटापासून सुरू झाली. यानंतर त्यांनी ओळीने बरेच हिट चित्रपट दिले. हे सर्व चित्रपट दाक्षिणात्य होते. गंमत म्हणजे, भप्पी ज्या शैलीसाठी प्रसिद्ध होते, त्याचे प्रतिबिंब ‘हिम्मतवाला’ व त्यानंतरच्या लाटेतील चित्रपटांच्या गाण्यांत कोठेच दिसत नाही. ही गाणी पूर्णपणे वेगळी होती. याचे कारण म्हणजे, यात महत्त्वाचे योगदान होते ते अनिल-अरुण या त्यांच्या साहाय्यक जोडीचे. त्यामुळेच ‘नयनों में सपना’ आणि ‘हृदयी वसंत फुलताना’ यात साधम्र्य आढळते, तर ‘झोपडी में चारपाई’ आणि ‘ताई माझी जलवंती दिसते कशी फुलवंती’ (चित्रपट- मायबाप) यांच्या चाली सारख्या आहेत. ‘गुस्सा छोड दिल ना तोड’ हे गाणं आणि ‘प्रियतम्मा प्रियतम्मा ये जवळी सीम्मा’ यातील साम्य सहज लक्षात येतं. अशी अनेक उदाहरणे आहेत. असो, या गाण्यांनी एक काळ गाजवला आणि सर्वाना भुरळ घातली होती, यात शंका नाही.
ही भुरळ एवढी की, दिग्दर्शक साजिद खानला या ‘हिम्मतवाला’चा रिमेक करण्याचा मोह आवरला नाही. साजिद खानचा हा रिमेक याच महिन्यात प्रदर्शित होत असून त्यातील गाणी सध्या गाजत आहेत. सारेगामा इं. लि.ने या गाण्यांच्या अल्बमची निर्मिती केली आहे. संगीतकार साजिद-वाजिदने या चित्रपटाला संगीत देताना मूळ चित्रपटातील ‘नयनों में सपना आणि ताकी ताकी’ ही गाणी कायम ठेवून त्यांचे रिमिक्स केलं आहे. याशिवाय यात आणखी तीन गाणी आहेत. नवीन ‘नयनों में सपना’ची कहाणी आता सर्वज्ञात आहे. किशोरकुमारने वयाच्या ५४व्या वर्षी गायलेलं हे गाणं त्याच्या मुलाने वयाच्या ६१व्या वर्षी गायलं आहे. अमितकुमारने या गाण्यात असा काही खणखणीत आवाज लावला आहे की, किशोरचीच आठवण यावी! मात्र, आजकाल ट्रॅक रेकॉर्डिग होत असल्याने अमितकुमार व श्रेया घोषालचा ताळमेळ जमल्यासारखा वाटत नाही, अमितच्या जोरकस गायकीसमोर तिचा आवाज बराच फिका पडल्यासारखा वाटतो. ‘ताकी ताकी’ हे गाणं मिका आणि श्रेयाने गायलं आहे. या गाण्यात मात्र श्रेयाने कमाल केली आहे. आशा भोसले यांच्या शैलीची आठवण यावी, अशा ढंगात तिने हे गाणं गायलं आहे. उर्वरित तीन गाणी मात्र फारशी आश्वासक नाहीत. ‘धोखा धोखा’ हे गाणं भप्पी लाहिरी, सुनिधी चौहान आणि ममता शर्मा हिने गायलं आहे. काही वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या ‘सच बोल, काला कव्वा काट खाएगा’ की अशाच काही तरी गाण्याची चाल आणि ही चाल सारखी वाटते. सध्याच्या कानसेनांनाही तेच आवडतं. संगीतकार तरी काय करणार? शान, सोहम आणि शुभ मुखर्जी यांनी गायलेल्या एका गाण्याची चाल त्यातल्या त्यात बरी आहे, ठेका धरायला लावणारी आहे, मात्र त्याचे शब्द किती भयंकर व गलिच्छ आहेत! काय तर म्हणे ‘बम्प पे लात मार!’ असे शब्द सेन्सॉर होतात तेव्हा सेन्सॉर बोर्डावरची मंडळी कदाचित झोपा काढत असतील किंवा त्यांचीही पातळी तीच असेल. काळाचा महिमा! ‘थँक्स गॉड इट्स फ्राय डे’ या सुनिधी चौहानने गायलेल्या गाण्याने हा अल्बम संपतो. गाणी संपल्यानंतर लक्षात राहातं ते केवळ ‘नयनों में सपना’ हे गाणं आणि त्यानिमित्ताने ३० वर्षांपूर्वीचा तो काळ.  ‘कयामत से कयामत तक’ वगैरे नव्या पिढीचे चित्रपट आल्यानंतर भप्पी मागे पडला, कालबाह्य़ ठरला. गेली अनेक वर्षे तो फारसा चर्चेत नव्हता. रिमिक्स गाण्यांनी मात्र त्याला पुन्हा प्रकाशझोतात आणलं. ‘डर्टी पिक्चर’मधील ‘हुलाला हुलाला’ हे गाणं त्याच्या ‘उई अम्मा उई अम्मा’ची कॉपी होतं आणि आता ‘नयनों में सपना’चं रिमिक्स आलं आहे. पूर्वपुण्याई कामी येते ती अशी!
(समीक्षणासाठी सीडी-डीव्हीडी आमच्या नरिमन पॉइंट अथवा महापे कार्यालयात पाठवाव्यात.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:34 pm

Web Title: chitrageet 2
टॅग : Entertainment
Next Stories
1 नाट्यरंग : घराणेशाहीचे रंजक विडंबन
2 ‘लुटेरा’साठी घेतली ‘लिबर्टी’
3 आधी मद्यपान; नंतर गीतगान
Just Now!
X