राज्यातील सर्व महामंडळांत सिडकोचा प्रशासकीय दर्जा वाढला असून सिडकोच्या प्रशासकीय सेवेत आणखी एका सनदी अधिकाऱ्याची भर पडणार आहे. सिडकोत आता एकूण चार सनदी अधिकारी झाले असून नवीन उच्च अधिकाऱ्याला नैना आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाची स्वतंत्र जबाबदारी दिली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणालाही प्रशासकीय पातळीवर मागे टाकत सिडकोने आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, एसईझेड, गृहनिर्माणसारखे मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत.
नवी मुंबई शहर प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या सिडकोकडे आजच्या घडीला दोन मोठे प्रकल्प आहेत. त्यातील विमानतळाच्या बांधकामाचा टेक ऑफ आता पुढील वर्षांत होणार असून त्यासाठी स्वतंत्र सनदी अधिकाऱ्याची मागणी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी केली होती. ती तात्काळ मान्य करून रायगड जिल्ह्य़ातील २७० गावालगतच्या ६०० हेक्टर जमिनीवरील विकास आराखडा तयार करण्याच्या कामातही या अधिकाऱ्याला लक्ष घालावे लागणार असूून भाटिया यांच्या शिफारशीनुसार त्याची वर्णी लागणार आहे. या ठिकाणी नव्या दमाचा अधिकारी येण्याची शक्यता आहे. या अधिकाऱ्याला नैनाबरोबरच विमानतळाच्या प्रगतीवर लक्ष द्यावे लागणार आहे. विमानतळासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन केली जाणार आहे. सिडकोत सध्या चार उच्च अधिकारी कार्यरत आहेत.
उच्च अधिकाऱ्यांची एवढी कुमक एमएमआरडीएमध्येदेखील नाही. भाटिया हे प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी असून त्यानंतर साडेबारा टक्के योजनेचा सर्व भार सांभाळणाऱ्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा ह्य़ा सचिव दर्जाच्या आहेत. नवीन येणारा सनदी अधिकारी हा सचिव दर्जाचाच राहणार असून त्यांनाही सहव्यवस्थापकीय संचालकाचा पदभार दिला जाणार आहे. त्यामुळे सिडकोत यानंतर दोन सहव्यवस्थापकीय संचालक राहणार आहेत. नवीन शहर प्रशासक म्हणून असलेले सुनील केंद्रेकर यांच्यावर सध्या नयना क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम थोपविण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सनदी अधिकारी असलेल्या केंद्रेकर यांनी बीडमध्ये आपली वेगळी ओळख तयार केली होती. त्यानंतर पोलीस महासंचालक दर्जाच्या प्रज्ञा सरवदे यांनी सिडकोतील घोटाळा फाइल्स हातावेगळ्या करण्याचा सपाटा लावला असून त्याही आयपीएस दर्जाच्या अधिकारी आहेत.
त्यामुळे प्रशासकीयदृष्टय़ा भाटिया यांनी सिडकोची चांगली घडी बसविली असून पुढील वर्ष सिडकोच्या अनेक प्रकल्पांची नीव टाकणारे ठरणार आहे. या सर्व उच्च अधिकाऱ्यांच्या नियुक्तीत सिडकोतील कर्मचारी तुटवडय़ाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. सिडकोत सुमारे एक हजार कर्मचारी कमी असल्याची कामगार संघटनेची ओरड आहे.