गोठिवली येथे मंगळवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात अनधिकृतपणे बांधण्यात येणाऱ्या चार इमारतींवर सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकांकडून कारवाई करण्यात आली. कारवाई रोखण्यासाठी महिलांनी रस्त्यातच वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी करण्याचा प्रकार केला. परंतु पोलिसांनी त्यांचा हा विरोध हाणून पाडला. यावेळी काही वेळ तणावाचे वातावरण होते. कारवाईत चारही इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडको गावठाणातील अनधिकृत बेकायदा बांधकामांवरील कारवाई करत आहे. प्रकल्पग्रस्त व सर्व पक्षीय राजकीय नेत्यांच्या विरोधानंतरदेखील सिडकोने २०१२ नंतरची गावठाणामधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. या मोहिमेंतर्गत गोठवली येथेही ही कारवाई करण्यात आली.
गोठवलीमध्ये सिडकोचे अतिक्रमण पथक कारवाईसाठी येणार असल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त महिलांनी वटपौर्णिमेचे औचित्य साधून रस्त्यातच वडाचे झाड लावून वट पौर्णिमा साजरी केली व सिडकोच्या कारवाईला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला व महिला पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी ग्रामस्थांनी टायर जाळण्याचा प्रकार केला, परंतु अग्निशामन दलाने घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. वटपौर्णिमा साजऱ्या करणाऱ्या महिलांसह काही ग्रामस्थांनाही पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले.