डोंबिवली शहराला संपृक्त नैसर्गिक वायू (सी.एन.जी)द्वारे गॅसपुरवठा करण्याचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात रिक्षांना गॅसपुरवठा करण्यासाठीचे पंप सुरू करण्यात येतील. त्यानंतर घरगुती गॅसपुरवठा करण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
मागील दोन वर्षांपासून डोंबिवलीला ‘सी.एन.जी’ गॅसपुरवठा करण्यासाठी महानगर गॅस कंपनी प्रयत्नशील आहे. अंबरनाथ येथून या गॅसपुरवठय़ासाठी भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. वाहिनी टाकताना जमीन मालक अडथळे आणत असल्याने हे काम पूर्ण करण्यात कंपनीला अडथळे येत आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कल्याण पूर्वमधील काटेमानीवली उड्डाण पुलाजवळील सिग्नलजवळ महानगर गॅसला खोदकाम करण्यास कल्याण-डोंबिवली महापालिका, वाहतूक शाखेकडून विरोध करण्यात येत होता. त्यामुळे वाहिनी टाकण्याचे काम रेंगाळले होते. डोंबिवलीत रिक्षा चालकांनी ‘सीएनजी’ केंद्र सुरू करण्यासाठी नुकतेच आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांनी गॅस कंपनी, वाहतूक शाखा, महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काटेमानीवली पुलाजवळ रखडलेल्या कामातील अडथळे दूर करून हे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
आश्वासनांची खैरात
काटेमानीवली पूल ते डोंबिवलीपर्यंत गॅस वाहिनी टाकण्याचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. रिक्षांची वाढती मागणी विचारात घेऊन प्रथम ‘सीएनजी’ गॅस केंद्र, त्यानंतर घरगुती गॅसपुरवठा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासदारांना दिले. महापालिकेच्या डोंबिवलीजवळील खंबाळपाडा येथे परिवहन विभागाच्या आगारात परिवहन बससाठी प्रथम पेट्रोल, डिझेल पंप सुरू करण्यात येणार आहे. याच केंद्राच्या बाजूला ‘सीएनजी’ पंप सुरू करण्याचा प्रस्ताव परिवहन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे, असे परिवहन समिती सदस्य भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले.