कल्याण डोंबिवलीत गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेली सीमेंट रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत आहेत. ही कामे ठेकेदाराकडून अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्व साधारण सभेत प्रशासनावर टीकेची झोड उठवली. या संथगती कामामुळे शहरात जागोजागी वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांना चालणे अवघड झाले आहे. तरीही प्रशासन बथ्थडपणे हे सर्व उघडय़ा डोळ्यांनी पाहते कसे, असे प्रश्न नगरसेवकांनी सभेत उपस्थित केले. यावेळी ‘सीमेंट रस्त्यांची कामे संथगतीने सुरू असल्याची आणि कामांमध्ये दर्जा राखला जात नसल्याची’ कबुली पालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी सभेत दिली.
मनसेचे नगरसेवक शरद गंभीरराव यांनी सीमेंट काँक्रिट रस्त्यांची निकृष्ट कामे आणि संथगती कामावरून उद्भवलेल्या प्रश्नांवर पालिका अधिकारी, ठेकेदाराचा निषेध करण्यासाठी सभा तहकुबीची मागणी केली होती. पावणेदोन तास या विषयावर चर्चा झाली. सीमेंट रस्त्यांच्या पहिल्या टप्प्यातील चार कामांसाठी १०२ कोटी रुपये शासनाने दिले आहेत. या माध्यमातून कल्याण डोंबिवलीत कामे सुरू आहेत. ही कामे दर्जेदार व्हावीत म्हणून पालिकेने ‘मोनार्च’ कंपनीला ठेका दिला आहे. त्रयस्थ पाहणी संस्था म्हणून ‘व्हीजेटीआय’ला पालिकेने ५६ लाख रुपये मोजले आहेत. मग, या संस्थांकडून कोणती देखरेख या रस्ते कामांवर केली जात आहे. कामाच्या ठिकाणी ‘मोनार्च’ कंपनीचे कर्मचारी हजर नसतात. त्यामुळे ठेकेदाराचे कामगार मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. ‘व्हीजेटीआय’ने सीमेंट रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत गेल्या आठ महिन्यापूर्वी पालिकेला तपासणी अहवाल दिला आहे. हा अहवाल पालिकेने का दाबून ठेवला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शरद गंभीरराव यांनी केली.
‘या सर्व संथगती काम, निकृष्ट कामांना प्रकल्प अभियंता प्रमोद कुलकर्णी जबाबदार आहेत. कुलकर्णी यांना आयुक्त सोनवणे पाठीशी घालत असल्यामुळे ते बेजबाबदारपणे वागत आहेत. कुलकर्णींकडे रस्त्याबाबत केलेल्या कोणत्याही तक्रारीची ते दखल घेत नाहीत, अशी टीका सेनेच नगरसेवक मोहन उगले यांनी केली. ‘लोकसत्ता’मध्ये ‘व्हीजेटीआय’ अहवालाचे वृत्त वाचले म्हणून तरी आम्हाला, असा अहवाल आल्याचे समजले असेही ते म्हणाले.
कल्याणमधील दुर्गाडी ते शहाड, लाल चौकी ते आधारवाडी, सहजानंद चौक ते संतोषी माता रस्ता, तिसगाव, श्रीराम सिनेमा गृह, मलंग रस्ता, डोंबिवलीत घरडा सर्कल ते टिळक चौक, मानपाडा रस्ता, राजाजी रस्ता, टिटवाळा या ठिकाणी अतिशय ढिसाळपणे सीमेंट रस्त्यांची कामे सुरू असल्याची टीका मनोज घरत, श्रेयस समेळ, बुथाराम सरनोबत, नवीन सिंग, विद्याधर भोईर, मंदार हळबे, विश्वनाथ राणे यांनी केली.  रस्ते तयार करताना त्या ठिकाणाहून निघालेली माती ठेकेदार ८०० रुपये ट्रक पद्धतीने अनधिकृत चाळी उभारणाऱ्या भूमाफिया, विकासकांना बाहेर विकत आहे. यावर पालिकेचे नियंत्रण आहे का,  दुकानादारांकडून ठेकेदार दुकानासमोर पदपथ ठिकठाक केला म्हणून पैसे उकळत असल्याचे विद्याधर भोईर आणि मंदार हळबे यांनी सांगितले.
‘सीमेंट रस्त्यांच्या कामामध्ये सेवा वाहिन्या आहेत. याशिवाय महावितरण, दूरसंचार विभागाच्या वाहिन्या आहेत. या वाहिन्या हटवण्याचा विचार निविदा प्रक्रिया करताना केला नाही. त्यात वाहतूक विभागाने रस्ते कामांना टप्प्याने परवानग्या दिल्या. त्यामुळे सीमेंट रस्त्यांची कामे वेगाने सुरू नाहीत. या कामांच्या दर्जाबाबत नगरसेवकांनी केलेल्या टीकेत तथ्य असल्याचे आयुक्त सोनवणे म्हणाले. या प्रकरणात प्रकल्प अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्यावर कारवाई होण्याची मागणी फेटाळून लावत नेहमीच प्रशासनाची पाठराखण करण्यात ‘मग्शूल’ असलेल्या महापौर कल्याणी पाटील यांनी याप्रकरणी आढावा बैठक घेण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.