News Flash

भाजपतील वाद, शिवसेनेसाठी ताप

ठाणे महापालिकेतील सत्ता टिकवायची असेल तर भारतीय जनता पक्षाच्या आठ नगरसेवकांशिवाय पर्याय नाही याची पुरेपूर कल्पना असलेल्या शिवसेनेच्या

| January 9, 2014 07:36 am

ठाणे महापालिकेतील सत्ता टिकवायची असेल तर भारतीय जनता पक्षाच्या आठ नगरसेवकांशिवाय पर्याय नाही याची पुरेपूर कल्पना असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना ठाणे भाजपमध्ये सुरू असलेल्या सुंदोपसुंदीवर उतारा शोधताना अक्षरश:  घाम फुटू लागला आहे. मिलिंद पाटणकर यांच्या मारहाणनाटय़ानंतर रिक्त झालेल्या उपमहापौरपदावर कोणाची निवड करायची यावरून भाजपमध्ये नव्याने रंगलेल्या नाराजीनाटय़ावर मार्ग काढताना मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शिवसेना नेत्यांना बरीच कसरत करावी लागल्याचे वृत्त आहे. तरीही प्रत्यक्ष निवडीदरम्यान भाजपच्या नळपाडा येथील नाराज नगरसेविका आशा शेरबहाद्दूर आणि इंदिरानगर येथील राजकुमार यादव या दोघा नगरसेवकांनी उशिरापर्यंत अनुपस्थिती दर्शविल्याने शिवसेना नेत्यांच्या तोंडाचे पाणी पळाले असून सहा महिन्यांवर आलेल्या महापौर निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्वकीयांपेक्षा भाजपच्या नगरसेवकांच्या नाकदुऱ्या काढण्याची पाळी या नेत्यांवर आली आहे.
भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नसून आशा सिंग आणि राजकुमार यादव नाराज नाहीत, असा दावा पक्षाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांनी केला. पाटणकर यांच्या वक्तव्यांना फारशी किंमत देण्याची गरज नाही. ठाणे भाजप विस्कळीत कशी होईल हा त्यांचा उद्देश असून त्यांच्यामार्फतच अशा नाराजीच्या खोटय़ा बातम्या पेरल्या जात आहेत, असा दावा वाघुले यांनी केला.  
ठाणे भाजपमधील मतभेद काही आजचे नाहीत. मिलिंद पाटणकर यांची पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड होताच या मतभेदांनी मात्र टोक गाठल्याचे चित्र दिसत आहे. ठाणे महापालिकेत युतीकडे ६५ नगरसेवकांचे संख्याबळ असून त्यामध्ये भाजपच्या आठ नगरसेवकांचा समावेश आहे. आघाडीकडे ६१ नगरसेवक असून चुरशीच्या अशा या स्पर्धेमुळे एकमेकांचे नगरसेवक गळाला लावण्यातच दोन्ही बाजूंचे नेते व्यग्र असतात, असे सध्याचे चित्र आहे. शिवसेनेचे महापालिकेत सर्वाधिक ५३ नगरसेवक आहेत. या नगरसेवकांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आतापर्यत येथील नेत्यांना यश आले असले तरी भाजपमधील सावळागोंधळाचे करायचे काय, असा प्रश्न शिवसेना नेत्यांना पडला आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीत भाजपच्या विष्णुनगर येथील नगरसेविका सुहासिनी लोखंडे अचानक गायब झाल्या. भाजपतील एका ज्येष्ठ नगरसेवकाचा आणि आघाडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांचा दोस्ताना ठाण्यातील राजकीय वर्तुळात शेंबडय़ा पोरासही ठाऊक आहे. या ज्येष्ठांच्या सांगण्यावरूनच लोखंडेबाई गायब झाल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. मुंब््रयातील काँग्रेसच्या तिघा नगरसेवकांना गळाला लावत शिवसेनेने डाव आघाडीवर उलटविला खरा, मात्र लोखंडेबाईंचे गायब होणे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसाठी डोकेदुखी ठरली होती.
नाराजीनाटय़ सुरूच
त्यानंतरही महापालिकेतील महत्त्वाच्या प्रस्तावांवर शिवसेनेला खिंडीत गाठायची एकही संधी भाजपचे नगरसेवक सोडत नाहीत, असा अनुभव आहे. विक्रांत युद्धनौकेस पाच कोटी रुपयांची मदत देण्याचा शिवसेनेच्या प्रस्तावास भाजपने मोडता घातला. टीएमटी सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे अजय जोशी यांनी आघाडीच्या बाजूने मतदान केले. भाजपमधील शहर स्तरावर सुरू असलेल्या मतभेदांमुळेच पराभवाची नामुष्की सहन करावी लागल्याची शिवसेना नेत्यांची भावना आहे. या पाश्र्वभूमीवर उपमहापौरपदासाठी मुकेश मोकाशी यांचे नाव जाहीर होताच भाजपमध्ये पुन्हा एकदा मतभेद उसळून आल्याने शिवसेना नेत्यांची भंबेरी ऊडाली आहे. मोकाशी यांच्या निवडीमुळे नाराज झालेले आशा शेरबहाद्दर सिंग आणि राजकुमार यादव या भाजपच्या दोघा नगरसेवकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न करताच मंगळवारी रात्री उशिरा शिवसेना आमदार एकनाथ िशदे यांनी धाव घेत या दोघांची समजूत काढल्याचे वृत्त आहे. पक्षाविरोधात तोफ डागायची तयारी करत या दोघा नगरसेवकांनी पत्रकार परिषदेच्या आयोजनाची तयारी केली होती. काही पत्रकारांना तसे संदेशही देण्यात आले होते. मात्र, ठाण्यातील एका सेनाप्रेमी पत्रकाराने एकनाथ िशदे यांच्या हा प्रकार कानावर घातला आणि िशदे यांनी आशा यांचे नळपाडातील घर गाठले. त्यानंतरही बुधवारी झालेल्या निवडप्रक्रियेदरम्यान भाजपचे हे नाराज नगरसेवक उशिरापर्यंत फि रकले नाहीत. विशेष म्हणजे, मोकाशी यांची निवड होताना ठाण्यात परतलेले मिलिंद पाटणकर यांनीही मोकाशी, संजय वाघुले यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक तोंडावर असताना भाजपतील वाद टोकाला पोहोचल्याने शिवसेनेला या वादाचा ताप होऊ लागला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 7:36 am

Web Title: conflict in bjp elevates problem for shiv sena
टॅग : Bjp,Shiv Sena
Next Stories
1 महोत्सवात दृश्यकलांचे मनोहारी दर्शन..!
2 आता मोबाइल अ‍ॅप्सद्वारे कळवा समस्या
3 माळशेज घाटातील चौपदरीकरण मार्गी लागणार
Just Now!
X