राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या नगरसेवकांना बजावलेला व्हीप धुडकावून लावत पक्षाच्या तीन नगरसेवकांनी आपले मत काँग्रेसच्या पारडय़ात टाकले. याबरोबरच शिवसेनेच्या एका मताच्या पाठबळावर औसा नगरपालिकेत काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा नगराध्यक्षपद आपल्याकडे राखले. काँग्रेसच्या सुनील मिटकरी यांच्या गळय़ात या पदाची माळ पडली.
नगराध्यक्षपदासाठी झालेल्या तिरंगी लढतीत काँग्रेसचे मिटकरी यांना पक्षाची ६, राष्ट्रवादीची ३ व शिवसेनेचे १ अशी १० मते मिळाली. राष्ट्रवादीचे अफसर शेख यांना पक्षाची ७ पैकी ४ मते मिळाली, तर भाजपचे लहू कांबळे यांना युतीची ५पैकी ४ मते मिळाली.
नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान झाले. यासाठी झालेल्या सर्वसाधारण सभेवेळी १८ नगरसेवक व २ स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते. पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सहकार्य केले. उपस्थित नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले.
राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीने पक्षाच्या नगरसेवकांनी पक्षाच्या उमेदवारास मतदान करावे, असा व्हीप जारी केला होता. मात्र, ३ नगरसेवकांनी तो धुडकावून काँग्रेस उमेदवारास मतदान केले. गेल्या निवडीच्या वेळी भाजप-शिवसेनेने काँग्रेसला साथ दिली होती. या वेळी राष्ट्रवादीचे ३ व शिवसेनेच्या एका नगरसेवकाने काँग्रेस उमेदवाराला मतदान केले. अशा प्रकारे सलग दुसऱ्यांदा काँग्रेसने नगराध्यक्षपद आपल्याकडे राखले. या निवडीचे फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष शेषेराव पाटील, माजी नगराध्यक्ष मुजबुद्दीन पटेल, ज्येष्ठ समाजसेवक सुभाषअप्पा मुक्ता, इसूफ पटेल, प्रा. महंमद आलुरे, युवा नेते संतोष मुक्ता आदींनी नूतन नगराध्यक्षांचे अभिनंदन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी पंडित नौसारे, निरीक्षक रामचंद्र गोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.