आई-वडील रेल्वे अपघातात मरण पावल्यानंतर त्यांच्यासोबत असूनही मरणाच्या दाढेतून वाचलेल्या रोशनी पाटेकर या अनाथ मुलीने वसतिगृहात राहून कष्ट, जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले असून आता ती महापे येथील एका प्रसिद्ध कॉपरेरेट कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. एकलेपण आलेल्या प्रत्येकानेच बोध घ्यावा अशी या तरुणीची वाटचाल आहे.
कार्यालयात ये-जा करण्याच्या सोयीसाठी सध्या ती डोंबिवलीत राहते. अहमदनगर येथील पाटेकर कुटुंब काही कामानिमित्त ठाण्यात आले होते. ठाणे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्ग ओलांडताना वीस वर्षांपूर्वी या कुटुंबाचा अपघात झाला. आई, वडील जागीच मरण पावले. वाचली ती एकटी रोशनी. तिचा एक पाय गुडघ्यापासून अपघातात गेला. तिला ठाण्यातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता हिला कायमचे सांभाळावे लागेल, या विवंचनेने नातेवाइकांनी रुग्णालयात येऊन या जखमी मुलीची भेट घेऊन साधी विचारपूसही केली नाही. डॉक्टर, परिचारिका यांनीच तिचा सांभाळ केला. ठाण्यातील माँ निकेतन संस्थेच्या कु. पिमेंटा यांनी तिच्या सांभाळण्याची जबाबदारी घेतली. याच ठिकाणी राहून तिने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हे करताना दोन पैसे हाताशी असावेत म्हणून तिने विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेतल्या. संस्थेमध्ये कष्टाची कामे करून तेथेच उपजीविकेची सोय केली.
कष्ट, जिद्द आणि धडपडीचा हा प्रवास सुरू असतानाच रोशनीला पटनी (आयगेट)कॉप्युटरमध्ये नोकरी मिळाली. महापे येथे ती नोकरीला आहे. नोकरी करतानाच पदवी, एम.बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कंपनीतील बारा वर्षांच्या प्रवासात तिने ‘वरिष्ठ कार्यकारी व्यवस्थापक’ पदापर्यंत झेप घेतली आहे. सूत्रसंचालन, गायन, गिटार वादन, पॅराजम्पिंग, वाचन हे रोशनीचे आवडीचे विषय आहेत. लोकलचा अपंगांचा डबाच काय, शासनाच्या कोणत्याही अपंग सुविधेचा लाभ न घेता तिचा हा प्रवास सुरू आहे. जयपूर फूट हा एकमेव तिचा सोबती आहे. ‘जगण्यातील दु:ख माणसाला घडवते. नाकारलेपणाची भावना माणसाला पुढे जाण्याची प्रेरणा देते, हेच आपण या प्रवासात शिकलो,’ असे रोशनी पाटेकर सांगते.