कष्टकरांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तालुक्यातील  देवठाण येथे सोमवारपासून सहा कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत. महावितरण व जलसंपदाच्या प्रश्नासंदर्भात अधिका-यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले असले तरी महसूल खात्यासंदर्भातील प्रश्न प्रलंबित असल्यामुळे हे उपोषण उद्याही सुरूच ठेवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे.
तुळशीराम कातोरे, वकील ज्ञानेश्वर काकड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. महसूल, महावितरण, एसटी, जलसंपदा आणि सार्वजनिक विभागाच्या विविध मागण्यांसंदर्भात हे बेमुदत उपोषण सुरू आहे. महावितरणचे समशेरपूर शाखा अभियंता टी. बी. परिहार यांनी आज उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन दिले. तसेच जलसंपदाचे सहायक अभियंता किरण देशमुख यांनीही खात्याशी संबंधित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. नायब तहसीलदार रूपेश सुराणा यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली, मात्र कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही.
निराधार योजनेसाठी आवश्यक दाखले त्वरित मिळावेत, नवीन कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अन्नसुरक्षा योजनेंतर्गत धान्य वितरण तातडीने सुरू करावे, फाटलेल्या शिधापत्रिका महसूल खात्याने स्वखर्चाने बदलून द्याव्यात, दारिद्रय़रेषेच्या यादीत नाव असणा-यांना पिवळय़ा रंगाच्या शिधापत्रिका मिळाल्यात, रोजगार हमीची कामे तातडीने सुरूकरावीत आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.