बोरीबंदर ते ठाणे दरम्यान सुरू झालेल्या भारतातील पहिल्या रेल्वेला बुधवारी १६१ वर्षे पूर्ण होत असताना याच रेल्वेसाठी बांधण्यात आलेले नवी मुंबईतील दिघा येथील १० दशलक्ष पाणी क्षमतेचे धरण आजही दुर्लक्षित स्थितीत पडले आहे.
रेल्वेच्या अवाढव्य विस्तारामुळे इतक्या छोटय़ा धरणाची रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने फार मोठी किंमत नाही. नवी मुंबई पालिकेने गेली १० वर्षे मागणी करूनही हे धरण पालिकेच्या ताब्यात न मिळाल्याने पालिकेनेही दुर्लक्ष केले असून, या धरणाला सध्या कोणी वाली नसल्याचे चित्र आहे. यामुळे पाण्याचे उत्तम स्रोत असणाऱ्या या धरणाच्या चारही बाजूने मात्र झोपडपट्टी आणि तबेल्यावाल्याचे चांगलेच प्रमाण वाढले आहे. हे धरण आणि तेथील जमीन आता हडप करण्यात आल्याचे स्पष्ट आहे.
भारतातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे दरम्यान सुरू झाल्याची नोंद आहे. वाफेचे इंजिन व कारशेडसाठी लागणारे पाणी कळव्याजवळ असणाऱ्या दिघा येथील धरणातून घेतले जात होते. त्यासाठी पारसिक डोंगराच्या कुशीत निर्सगाच्या वातावरणात व्ही आकाराच्या तयार होणाऱ्या दरीजवळ हे १० दशलक्ष क्षमतेचे धरण १९०० शतकाच्या शेवटी बांधण्यात आले होते. या धरणातील पाणी कळव्यापर्यंत नेण्यासाठी ब्रिटिश सरकारने जलवाहिनीदेखील टाकलेली आहे. रेल्वेचा विस्तार व व्याप वाढल्यानंतर या धरणाचा विसर रेल्वेला पडला. तेव्हापासून हे धरण दुर्लक्षित आणि दरुगधीमय झालेले आहे. त्यातील गाळ गेली ६० वर्षे काढला गेला नाही. हे धरण आमच्या ताब्यात लीजवर दिल्यास आम्ही त्याची स्वच्छता करू, या धरणामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे सोपे जाईल, असे पालिकेने रेल्वेला अनेक वेळा कळविले आहे.
खासदार संजीव नाईक व आमदार संदीप नाईक यांनीही त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, पण रेल्वे प्रशासन या मागण्यांना भीक घालत नाही असे दिसून येते. रेल्वे आपल्या या संपत्तीकडे लक्ष देत नसल्याने तेथे झोपडपट्टीदादांचे फावले असून पाण्याची जागा असल्याने मागील काही वर्षांत या ठिकाणी हजारो झोपडय़ा उभ्या राहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे गाई-गुरांसाठी धरणातून झिरपणारे पाणी बोअरिंग विहिरीमुळे मिळत असल्याने अनेक तबेलावाल्यांनी आपले बस्तान या ठिकाणी बसविले आहे. रेल्वे धरण ताब्यात देत नाही म्हणून पालिकेनेही त्याकडे कानाडोळा केला असून परिसराला गोकुळाचे स्वरूप आले आहे.