संकल्पना व वास्तुशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या सातपूर येथील ‘आयडिया’ महाविद्यालयात बुधवारी १५ ते २० जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत तोडफोड केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या महाविद्यालयात विद्यार्थिनीवर रॅगिंग झाल्याची तक्रारही केली जात आहे. काही विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनीला नावाची विचारणा केल्याचा प्रकार घडल्यानंतर टोळक्याने महाविद्यालयात तोडफोड केल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. या प्रकरणी व्यवस्थापनाने तोडफोड झाल्याची तर संबंधित पालकाकडून विद्यार्थिनीची रॅगिंग झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. संबंधित पालक राष्ट्रवादीचे प्रदेशस्तरीय पदाधिकारी आहेत. आदल्या दिवशी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयात येऊन दबावतंत्राचा वापर केल्याचा व्यवस्थापनाचा दावा आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीत विद्यावर्धन संस्थेचे इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, एनव्हार्मेन्ट अॅण्ड आर्किटेक्टस् हे महाविद्यालय आहे. सुमारे ३५० विद्यार्थी या ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षणक्रमात शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाच्या म्हणण्यानुसार १५ ऑगस्टसाठी विद्यार्थी काही कार्यक्रमांचे आयोजन करीत होते. या वेळी एका विद्यार्थिनीकडे नावाची विचारणा करण्यात आली. माहिती विचारण्याची पद्धत योग्य नसल्याने ही बाब संबंधित विद्यार्थिनीला खटकली आणि ती महाविद्यालयातून निघून गेली, अशी माहिती प्राचार्य मंजु बेळे यांनी दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी १५ ते २० जणांचे टोळके महाविद्यालयात आले होते. विद्यार्थी निघून गेले असल्याने टोळक्याने महिला अधिक्षिकेला शिवीगाळ केली. दरम्यानच्या काळात संस्थेचे संचालक विजय सोहनी यांनी महाविद्यालयात धाव घेतली. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांनीही महाविद्यालय गाठत दबाव आणून हा विषय मिटविल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
बुधवारी या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. संबंधित विद्यार्थिनीचे तीन ते चार नातेवाईक महाविद्यालयात आले. त्यांनी तिचा प्रवेश रद्द करण्यासाठी अर्ज सादर केला. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून विहित शुल्कही नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. ही मंडळी निघून गेल्यानंतर काही वेळातच १५ ते २० जणांचे टोळके लाठय़ा घेऊन महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी वर्गाच्या काचा, खिडक्या, दरवाजांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. काहींनी वर्गात शिरून महिला प्राध्यापकांना शिवीगाळ केली. अचानक घडलेल्या घटनेमुळे महाविद्यालयात एकच गोंधळ उडाला. टोळक्यातील अनेकांनी मद्यप्राशन केलेले होते, अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
१५ ते २० मिनिटे धुडगूस घातल्यानंतर टोळक्याने पोबारा केला. हा संपूर्ण घटनाक्रम महाविद्यालयातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी व पंकज डहाणे यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या घटनाक्रमामागे रॅगिंगचे कारण पुढे येत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. संस्थेत आपल्या पाल्यावर रॅगिंग झाल्याची तक्रार पालकांनी केली आहे. मुलीचे वडील व राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिलीप खैरे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महाविद्यालयात झालेल्या तोडफोडीच्या घटनेशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. रॅगिंगविषयक तक्रार महाविद्यालयाकडेही करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.