स्मशानभूमीवर अतिक्रमण झाल्याने अंत्यविधीसाठी जागा मिळू न शकल्यामुळे महिलेचा मृतदेह थेट तहसील कार्यालयात आणण्यात आला. या प्रकारामुळे कार्यालयात मोठी खळबळ उडाली.
परतूर तालुक्यातील सातारा वाहेगाव येथील दलितांनी महिलेचा मृतदेह तहसील कार्यालयात आणून ठेवला होता. तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर अखेर मृतदेह तेथून हलविण्यात आला.
सातारा वहिगाव येथील दलित स्मशानभूमीवर झालेल्या अतिक्रमणामुळे अंत्यसंस्कारात मात्र अडचण निर्माण झाली आहे. संबंधित यंत्रणा याबाबत लक्ष देत नसल्याची तक्रार यापूर्वीही करण्यात आली. शनिवारी गावातील मीना बाळाभाऊ पटेकर या महिलेचे निधन झाले. परंतु अंत्यसंस्कार कुठे करावे, असा प्रश्न निर्माण झाला. परिणामी, दुसऱ्या दिवशी रविवारी काहींनी नातेवाइकांसह या महिलेचा मृतदेह परतूर तहसील कार्यालयात आणून ठेवला. या प्रकारामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी बारा ते चार दरम्यान हा मृतदेह तहसील कार्यालयातच होता. या वेळी स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी करणारे ५०जणांच्या सहय़ांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
स्मशानभूमीवरील अतिक्रमणाची मंडल अधिकारी व तलाठय़ामार्फत पाहणी करून एक महिन्यात अतिक्रमणे हटविण्याचे लेखी आश्वासन तहसीलदारांनी या वेळी दिले.