डिसेंबर २०१२ मध्ये सलग १२ वैविध्यपूर्ण नाटय़ प्रयोग सादर करणाऱ्या येथील दीपक मंडळाच्या ‘१२.१२.१२’ या उपक्रमाची नोंद ‘वर्ल्ड अ‍ॅमेझिंग रेकॉर्डस’ मध्ये करण्यात आली आहे. मंडळाला यासंदर्भातील प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्राप्त झाले असून ‘ड्रामा मॅरेथॉन’ म्हणून या उपक्रमास गौरविण्यात आले आहे. यानिमित्ताने मंडळाच्या वतीने गंगापूर रस्त्यावरील शंकराचार्य न्यासमधील सभागृहात चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दीपक मंडळ (सांस्कृतिक विभाग) नाटकाशी बद्ध झालेली हौशी रंगकर्मीची संस्था आहे. दोन सव्वादोन दशकांपासून मंडळाच्या वतीने रंगमंचावर वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. विविध वयोगटातील, क्षेत्रातील तब्बल १२० कलाकार आणि जवळपास तितक्याच संख्येने सर्व काही सांभाळणारे पडद्यामागचे कलाकार एकदिलाने उभे राहिल्यानेच डिसेंबर २०१२ मध्ये कालिदास   कलामंदिरात   सलग    १२ तास प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे विविध नाटय़प्रयोग    सादर   करण्यात मंडळाला यश आले.
या उपक्रमासाठी विषयांची वैविध्यता, कल्पक मांडणी, नेत्रदीपक प्रकाश योजना, पूरक नेपथ्य, सशक्त संहिता, परिणाम कारक रंगभूषा व वेशभूषा आणि ताकदीचे सादरीकरण सर्वकाही दीपक मंडळाच्या सभासदांनीच केले. त्यांच्या या उपक्रमाची नोंद ‘वर्ल्ड अ‍ॅमेझिंग रेकॉर्डस्’च्या माध्यमातून आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.
आनंदोत्सव कार्यक्रमास सर्व नाटय़ रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही मंडळाचे अध्यक्ष सुरेश गायधनी यांनी केले आहे.