News Flash

पदवीधर मतदार नोंदणीस १५ नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ

नागपूर पदवीधर मतदारांच्या नोंदणीची मुदत १५ नोव्हेंबपर्यंत वाढविल्याने भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांनी नोंदणीचा वेग वाढविला आहे.

| November 6, 2013 08:29 am

नागपूर पदवीधर मतदारांच्या नोंदणीची मुदत १५ नोव्हेंबपर्यंत वाढविल्याने भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांनी नोंदणीचा वेग वाढविला आहे. मात्र, ही प्रतिष्ठेची लढत कोणत्या उमेदवारांमध्ये होणार याचे चित्र स्पष्ट होण्यास वेळ लागणार आहे. काँग्रेसतर्फे धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन तायवाडे यांना उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे. भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. दलितांमधून माजी आयएएस अधिकारी किशोर गजभिये यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे. गजभिये यांनी लावलेला नोंदणीचा धडाका पाहता काँग्रेस आणि भाजप उमेदवारापुढे प्रबळ आव्हान उभे करण्याची क्षमता गजभिये यांच्यात आहे.
नितीन गडकरींची पदवीधर मतदारसंघातील ही शेवटची टर्म आहे. गेल्या सहा निवडणुकांपासून त्यांनी या जागेवर एकहाती वर्चस्व ठेवले आहे. परंतु, त्यांचा उत्तराधिकारी निवडताना भाजपची पक्षांतर्गत गोची झाल्यासारखी स्थिती आहे. वरिष्ठतेचा निकष लावला तर महापौर अनिल सोले यांचा दावा पहिल्या क्रमांकावर समजला जात आहे. परंतु, भाजपच्या नोंदणीची धुरा सांभाळणारे नगरसेवक संदीप जोशी यांची तरुणांमधील लोकप्रियता लक्षात घेता त्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचे समर्थक सक्रिय झाले आहेत. सोले अनेक वर्षांपासून नगरसेवक आहेत. महापालिकेतील अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु, महापौरपदाची कारकीर्द फारशी यशस्वी राहिलेली नाही. शहरातील समस्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना महापौर पाठिशी घालत असल्याचे आरोप मोठय़ा प्रमाणात होत आहेत. महापालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. सोले यांचा कोणताही प्रभाव शहरावर पडू शकलेला नाही, असाही एक मतप्रवाह आहे. त्या तुलनेत संदीप जोशी यांची प्रतिमा स्वच्छ आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना संदीप जोशी यांनी कामाची छाप पाडली आहे. स्थायी समितीचे नेतृत्त्व करताना त्यांची निर्णयक्षमता आणि नेतृत्त्वगुणांचा अनुभव भाजपश्रेष्ठींना आला आहे. त्यामुळे सध्यातरी संदीप जोशी यांचे पारडे जड असल्याचे समजले जाते. सध्या दयाशंकर तिवारी यांच्याही नावाची चर्चा अचानक सुरू झाली आहे. सोले आणि जोशी यांच्या तुलनेत दयाशंकर तिवारी यांची कामगिरी अधिक उजवी असल्याचे भाजपातील काहींचे मत आहे. विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर देणारा नेता म्हणून तिवारी महापालिकेत ओळखले जातात. त्यामुळे उमेदवारी मिळण्याच्या शर्यतील सोले, जोशी आणि तिवारी यांची नावे प्रामुख्याने चर्चिली जात आहेत. परंतु, उमेदवार अंतिम शब्द गडकरी यांचाच राहणार असल्याने वाडय़ावरून कोणाचे नाव जाहीर होते, याची प्रतीक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 8:29 am

Web Title: degree holders constituency date of filling form extended up to 15th november
Next Stories
1 शेतकरी विधवांच्या घरी दिवाळीतही अंधार
2 सोनिया २० नोव्हेंबरला नागपुरात
3 सिकलसेलग्रस्तांसाठीच्या शासकीय घोषणा पोकळ
Just Now!
X