जमिनी खरेदी-विक्रीच्या प्रकरणात वादग्रस्त असलेल्या डायोसेशन कॉन्सिल ट्रस्टचे विश्वस्त मंडळ १९९८ पासून निवडण्यात आलेले नाही, अशी माहिती नाशिकच्या धर्मदाय उपआयुक्त कार्यालयाने विधी मंडळातील तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी अतारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. डायोसेशनचे भूमापन क्रमांक ७१९ वर नसताना जमिनींची विक्री करून कोटय़वधींचे गैरव्यवहार केल्याबाबत विचारणा केली होती. विक्री नोंदी नोंदीनुसार मालमत्तेच्या महसुली सात बारा वरील नोंदीतील नाशिक डायोसेशन ट्रस्ट प्राय. लिमिटेड हे नांव असताना विक्री व्यवहार झाले आहे व होत आहेत, असे उत्तरात म्हटले आहे. मंत्रालय स्तरावरही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे निदर्शनास आणले आहे. या संदर्भात नाशिक धर्मदाय कार्यालयातील तत्कालीन उपआयुक्त अ. ना. चव्हाण यांनी अधिनियम १९५० चे कलम ४१ ब नुसार सर्व चौकशा प्रलंबित ठेवल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे. ही चौकशी अद्यापपर्यंत केली नसल्यामुळे व्यवस्थापनावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व फेरफार अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे न्यासावर कोणते विश्वस्त मंडळ कार्यरत आहे, हे निश्चित होत नसल्याने कायदेशीर कारवाई करणे शक्य होऊ शकले नाही, असेही उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. या बाबतची माहिती पां. भा. करंजकर यांनी दिली.