शाहू मिलच्या जागेमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा उचित गौरव करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनविण्यात येईल, त्यासाठी वास्तू विशारद कंपन्यांकडून स्मारकाचा स्पर्धात्मक आराखडा मागविण्यात येईल. त्यातील चांगल्या स्मारकाची निवड करून त्याप्रमाणे त्याला आकार देण्यात येईल, असा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.    
राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक बनविण्यासंदर्भात आज महापालिकेमध्ये एक बैठक पार पडली. महापौर प्रतिभा नाईकनवरे, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आर्किटेक्ट असोसिएशनचे सचिन घाडगे, संतोष रामानी, संजय कुलकर्णी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
स्मारकाचा आराखडा कशा स्वरूपात असावा, तो कोणाकडून तयार करून घ्यावा, त्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश असावा या मुद्यावर बैठकीत चर्चा झाली. शाहू महाराजांचे कार्य व विचार यांचे प्रतिबिंब उमटणारा आराखडा तयार करून घेण्यात यावा, यासाठी स्पर्धात्मक निविदा मागविल्या जाव्यात. स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणे अपेक्षित आहे. त्यामध्ये खर्चाचा मुद्दा महत्त्वाचा नाही, असे महापौर नाईकनवरे यांनी सांगितले. याबाबत पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत लवकरच एक बैठक होणार असून त्यामध्ये स्मारकाचे चित्र आणखी स्पष्ट होईल, असेही त्या म्हणाल्या.