लोअर दुधना प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या कामांत बोगसपणा आढळला असून, या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी केली.
लोअर दुधनाच्या डावा व उजवा कालव्याचे काम सध्या सुरू आहे. िशदे अ‍ॅन्ड सन्स कंपनी या कंत्राटदारामार्फत हे काम करण्यात येत असून, या कामात निष्काळजीपणासह बोगसपणा आढळून आला आहे. एक मीटपर्यंत मुरुम टाकणे आवश्यक असताना तसे न करता काळी माती टाकून हे काम पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कामाची पाहणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी केली असता त्यांच्या निदर्शनास या बाबी आल्या. मातीमिश्रित मुरुमावर पाणी न टाकता काम सुरू आहे. लाइनिंग थिकनेस १० सेमी पाहिजे असताना अवघी ६ सेमी आढळून आली. रेतीमध्येही माती मिसळल्याने लाईनिंगला तडे गेले आहेत. अशी अनागोंदी या कामात सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले. या बोगस कामामुळे सरकारचा निधी वाया जाणार असून भविष्यात शेतकऱ्यांनाही या कालव्याचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे तत्काळ हे बोगस काम थांबवून या कामाची चौकशी करावी, अन्यथा शिवसेनेतर्फे कामावरच काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जाधव यांनी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला.