जुन्या दिनदर्शिकांचे कागद व कापडाचा चपखलपणे वापर करून निर्मित हिमालयाची रांग असो अथवा पिस्त्याची टरफले, पत्रावळी अन् सुतळीच्या मदतीने बनविलेले नेत्रदीपक सिंहासन असो. इतकेच नव्हे तर, चारा, लाकडी ठोकळा, काळी व शाडू माती, हळद, कुंकु, शेंदूर आणि नैसर्गिक रंगांच्या सहाय्याने बनविलेल्या सुबक गणेश मूर्ती असोत. गणेशोत्सवात सजावटी दरम्यान अशा अनोख्या संकल्पना प्रत्यक्षात आणून या उत्सवाला खऱ्या अर्थाने पर्यावरणस्नेही स्वरूप देणाऱ्या गणेशभक्तांना  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘लोकसत्ता’ यांच्या वतीने गौरविण्यात आले. त्यासाठी निमित्त ठरले ‘इको फ्रेंडली घरगुती गणपती सजावट’ स्पर्धेचे. या स्पर्धेत नाशिक विभागात विविध पारितोषिके मिळविणाऱ्या गणेशभक्तांना गंगापूर रस्त्यावरील प्रसाद मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, स्पर्धेच्या निमित्ताने काही वर्षांपासून एकत्रित आलेल्या पर्यावरणस्नेही गणेशभक्तांनी खास गट स्थापून शाळा व महाविद्यालयांमध्ये शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रमही सुरू केला आहे.
या सोहळ्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अंकुश फुलसे, उपप्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, लोकसत्ताचे वितरक देवदत्त जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लोकसत्ताच्या नाशिक कार्यालयाचे वितरण विभाग प्रमुख वंदन चंद्रात्रे, जाहिरात विभाग प्रमुख जगदीश कर्जतकर यांसह संपादकीय विभागातील सहकारी उपस्थित होते. गणेशोत्सव पर्यावरणस्नेही पध्दतीने साजरा होण्याकरिता विविध पातळीवर जागर होत आहे. घरगुती गणेशोत्सव देखील याच धाटणीने साजरा व्हावा म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘लोकसत्ता’ यांनी जनकल्याण सहकारी बँकेच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे ‘इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०१३’चे आयोजन केले होते. या स्पर्धेला नाशिक विभागातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. त्यात विभागातील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक अंकुश ठाकरे यांनी तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सचिन मराठे यांनी पटकावले. उभयतांना मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे रूपये ९,९९९ आणि ६६६६ मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. महेंद्र पांगरकर, माधुरी निकम, प्रशांत सातवेकर, प्रतिक पाटील व दर्शन खेडगावकर या गणेशभक्तांच्या सजावटीला उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. या पारितोषिकाचे स्वरूप प्रत्येकी रूपये २००१, मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे.
यावेळी मूर्ती आणि आरास तयार करताना लढविलेल्या संकल्पनांची पुरस्कार्थीनी माहिती दिली. चित्रकलेत पारंगत असलेल्या अंकुशने यंदा प्रथमच स्वत: मूर्ती तयार केली. गटातील इतरांकडून त्याला दिशा मिळाली. शाडू माती तीन ते चार दिवस भिजवून मूर्तीला तडे जाणार नाही याची दक्षता घेतली. रंगकामात शेंदूर वापरल्याने मूर्तीला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाल्याचे त्याने नमूद केले. द्वितीय क्रमांक मिळविणारा सचिन मागील पाच ते सहा वर्षांपासून या स्पर्धेत पारितोषिक मिळवत आहे. चारा, काळी व शाडू माती, नैसर्गिक रंगाचा वापर करून तयार केलेली मूर्ती हे त्याच्या सजावटीचे वैशिष्टय़े. पर्यावरणस्नेही पध्दतीने हा उत्सव साजरा करणाऱ्यांचा एक गट त्याने तयार केला आहे. या गटामार्फत शाळा व महाविद्यालयात शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचा उपक्रम राबविला जातो, असे मराठे याने नमूद केले. टाकाऊ साहित्यापासून सजावट करण्याचे तंत्र गणेशभक्तांनी आत्मसात केले आहे. वेगवेगळ्या कागदांचे तुकडे, पिस्त्याची टरफले, पत्रावळी व सुतळीचा वापर करून महेंद्र पांगरकर, प्रशांत सातवेकर यांनी श्री गणरायासाठी नेत्रदीपक सिंहासन तयार केले. प्रतिक पाटीलने घरातील जुन्या दिनदर्शिकेचा वापर हिमालयाचा देखावा तयार करण्यासाठी केला. दिनदर्शिकेची पाने मेंदीच्या कोनासारखी करून त्यावर पांढरे कापड टाकून हिमालय साकारल्याची माहिती प्रतिकने दिली. केवळ गणेशोत्सव नव्हे तर प्रत्येक सण पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पुरस्कार्थीनी केले आहे. प्रास्ताविक वंदन चंद्रात्रे यांनी केले.