ठाणे स्थानक परिसरात मंगळवारी सकाळी हत्तीचे दात विकण्यासाठी आलेल्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून हत्तीच्या दोन सुळ्यांचे चार तुकडे जप्त केले आहेत. कर्नाटक राज्यातून हत्तीचे दात आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, ते कुणाला विकणार होते, याविषयी अद्याप काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही. रामचंद्र कृष्णाप्पा लट्टे (३३, रा. कर्नाटक) आणि राजेंद्र सोपानराव जाधव (५२, रा. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेजण मंगळवारी सकाळी ठाणे स्थानक परिसरात हत्तीचे दात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांना अटक केली. या दोघांना ठाणे न्यायालयाने १८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांकडून हत्तीच्या दोन सुळ्यांचे चार तुकडे जप्त करण्यात आले आहेत. वनविभागामार्फत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये हे दात अस्सल असल्याचे स्पष्ट झाले आहे. शोभेच्या वस्तू, औषधे आदींकरिता वापर होत असल्याने हत्तीच्या दातांना आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष महत्त्व आहे. मात्र, दातांची किंमत जाहीर केल्यास दातांच्या तस्करीसाठी हत्तींची हत्या करण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे वनविभागाने या दातांची किंमत जाहीर करण्यास बंदी घातली आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2014 रोजी प्रकाशित
ठाण्यात हत्तीचे दात विकणारे अटकेत
ठाणे स्थानक परिसरात मंगळवारी सकाळी हत्तीचे दात विकण्यासाठी आलेल्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून हत्तीच्या दोन सुळ्यांचे चार तुकडे जप्त केले आहेत.
First published on: 20-12-2014 at 08:43 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elephant tooth smugglers arrested in thane