ठाणे शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या फेरीवाल्यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असतानाच गल्लीबोळात छोटी-मोठी अतिक्रमणेही बोकाळू लागली आहेत. विशेष म्हणजे, या अतिक्रमणाविरोधात रहिवासी सातत्याने तक्रारी करत असताना महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. ठाण्यातील गोकुळनगर भागात पर्यावरणस्नेही शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करणाऱ्या हिंदळेकर कुटुंबाला अशाच अतिक्रमणाचा फटका बसला असून या अतिक्रमणामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना गणेशमूर्ती तयार करणे शक्य होत नाही. मात्र यासंबंधी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
गोकुळनगर भागात अनिल हिंदळेकर यांची वडिलोपार्जित मालकीची चाळ असून त्या ठिकाणी अनिल यांचे कुटुंब राहते. घराच्या परिसरातच अनिल हिंदळेकर यांचा शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याचा कारखाना आहे. चाळीमधील एक खोली अनिल हिंदळेकर यांनी दहा वर्षांपूर्वी पांडुरंग शेडगे यांना विकली.
मुलीच्या बाळंतपणासाठी घरासमोरील व्हरांडय़ात तात्पुरती शेड उभारण्याची परवानगी पांडुरंग यांची पत्नी शांताबाई यांनी घेतली होती. तसेच महिनाभरानंतर शेड काढून टाकेन असे सांगितले होते. त्यानुसार शेड उभारण्यास परवानगी दिली होती.
मात्र महिना उलटूनही शेड काढण्यात आली नसल्याने त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ करून जागा बळकावली. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता, कारवाई करण्याऐवजी पोलीस दिवाणी न्यायालयात जाण्याचा सल्ला देत आहेत, असेही त्यांनी सांगितले. या अतिक्रमणासंबंधी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी माहिती आदित्य हिंदळेकर यांनी दिली. एप्रिल महिन्यात गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते.
मात्र अनधिकृत शेड उभारून जागेवर अतिक्रमण केल्यामुळे अद्यापही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू झालेले नाही, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी उथळसर प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त गोरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दिली होती. तरीही कारवाई झालेली नाही असे प्रतीक हिंदळेकर यांनी सांगितले.

कारवाईचे आश्वासन
हिंदळेकर यांच्या जागेत झालेल्या अतिक्रमणाबाबत ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त गोरे यांच्याशी संपर्क साधला असता, या तक्रारीविषयी आपणास काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण दोन दिवस कामात व्यस्त आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर कारवाई करतो, असे आश्वासन त्यांनी दिले.