* चेंगराचेंगरी होऊन अपघाताची शक्यता
* कल्याण स्थानकात रेल्वेच्या अकलेचे दिवाळे
* लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये संताप
प्रवाशांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी रेल्वे स्थानकात पादचारी पुलांना सरकते जिने जोडण्याचा प्रकल्प राबविणाऱ्या मध्य रेल्वेने कल्याण स्थानकात मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी उभा केलेला हा प्रकल्प गैरसोयीचा कसा ठरेल, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शुभारंभाच्या तयारीत असलेल्या सरकत्या जीन्यांची ही निर्मिती प्रवाशांसाठी आतापासूनच चिंतेचा विषय ठरू लागली आहे.  
अरुंद, तितकाच जुना आणि जीर्ण झालेल्या अशा पादचारी पुलाला हे जिने जोडण्यात आले असून गुरुवारी या प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे. या पुलाच्या नेमक्या उलट दिशेला नव्याने बांधण्यात आलेला रुंद असा पूल असून अरुंद पुलास सरकते जिने जोडून रेल्वेने नेमके काय हाशील केले, असा सवाल प्रवासी संघटना आतापासूनच उपस्थित करू लागल्या आहेत.
ठाणे स्थानकात जून महिन्यात पहिल्या सरकत्या जिन्याचे अनावरण करण्यात आले होते. त्यापाठोपाठ ठाण्यातच दुसरा तर डोंबिवलीत तिसरा सरकता जिना बसवण्यात आला. ठाणे, डोंबिवली स्थानकात हे जिने बसविताना प्रामुख्याने नव्याने बांंधण्यात आलेल्या पादचारी पुलांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे जिन्याचा वापर करून पुलावर चढणारे प्रवासी सुरळीतपणे स्थानकाच्या दिशेने चालू शकत होते. कल्याण स्थानकात मात्र नेमके उलट चित्र उभे राहिले आहे. या स्थानकात बसवण्यात आलेला जिना अत्यंत जीर्ण झालेल्या जुन्या अरुंद ब्रिजवर बसवण्यात आला आहे. आधीच गर्दीमुळे चेंगराचेंगरीचे प्रसंग घडणाऱ्या या पुलावर या सरकत्या जिन्यांमुळे गर्दीच्या काळात अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. कल्याण स्थानकात दोनच वर्षांपूर्वी अत्यंत रुंद आणि मोठी क्षमता असलेला रेल्वे प्रवाशांसाठी पादचारी पूल बांधण्यात आला आहे. हा पूल सरकते जिने बसवलेल्या पुलापासून केवळ दहा ते वीस फुटांवर आहे. विशेष म्हणजे सरकते जिने जोडण्यासाठी आवश्यक जागा देखील या ठिकाणी उपलब्ध असल्याचे दिसते. मात्र रेल्वेने हा निर्णय घेतल्याने प्रवाशांनादेखील आश्चर्य वाटत आहे.
कल्याण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे याबद्दल विचारणा केली असता मुंबईच्या दिशेच्या आणि पुण्याच्या दिशेच्या अशा दोन पुलांच्या जागा ठरवण्यात आल्या होत्या. त्यानुसार मुंबईच्या दिशेने असलेल्या पुलावर हा पहिला सरकता जिना बसवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र नवा पूल सोडून जुन्या पुलांवर हे सरकते जिने कशासाठी बसवले याबद्दल मात्र त्यांनी देखील मौन बाळगले आहे. मंगळवारी कल्याणच्या सरकत्या जिन्यांचे काम पाहण्यासाठी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी देखील या सरकत्या जिन्यांच्या कामाची पाहणी केली. त्यांच्याकडे काही प्रवाशांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जाते. मात्र रेल्वेचा एकही वरिष्ठ अधिकारी याविषयी बोलण्यास तयार नाही.

लोकांच्या पैशाचा अपव्यय..
चुकीच्या पद्धतीने कामे करायची त्यातून पैसा घ्यायचा आणि त्यानंतर पुन्हा ती कामे बरोबर करण्यासाठी आणखी वाढीव पैसे घ्यायचे असा प्रकार सध्या रेल्वेमध्ये ठेकेदार आणि रेल्वे प्रशासन यांच्या माध्यमातून सुरू आहे. कल्याणमधील हा प्रकार त्याचे उत्तम उदाहरण असून लोकप्रतिनिधी मात्र श्रेय घेण्यासाठीच धावपळ करत असतात. त्यांना काम बरोबर आहे की चूक याच्याशी घेणे-देणे नसते, अशी टीका उपनगरीय रेल्वे महासंघाचे मधू कोटीयन यांनी वृत्तान्तशी बोलताना केली.

रेल्वेचा निर्णय अभ्यासपूर्वकच..
आपणास या जिन्यांचे नेमके ठिकाण लक्षात येत नसून रेल्वेने घेतलेला निर्णय हा अभ्यासपूर्वक असणार आहे. रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने सरकते जिने बसवताना संपूर्ण स्टेशनचा अभ्यास करून प्रवाशांचा मोठा वापर असलेल्या ठिकाणीच हे जिने बसविले आहेत. त्यामुळे मी याविषयी काय बोलणार, अशी प्रतिक्रिया कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांनी वृत्तान्तशी बोलताना दिली.