चंद्रपूर शहराच्या विकासासाठी अतिरिक्त शंभर कोटी देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला त्वरित मंजुरी प्रदान करावी, अशी मागणी महापौर संगीता अमृतकर  आणि  कॉंग्रेसचे महासचिव अशोक नागापुरे
यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
विदर्भातील अकरा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षांची बैठक प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हैदराबाद हाऊस येथे झाली.
या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रोहयो मंत्री नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदार, खासदार  आणि प्रदेश कॉंग्रेसचे पदाधिकारी हजर होते. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गजानन गावंडे, महापौर संगीता अमृतकर, महासचिव अशोक नागापूरे, अ‍ॅड. अविनाश ठावरी, सहसचिव अभिषेक येरगुडे, सिंधी पंचायतचे कोषाध्यक्ष सुदेश रोहरा यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
तसेच बल्लारपूर तालुकाध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नगराध्यक्ष रजनी मूलचंदानी, नगरसेवक भास्कर माकोडे, पोंभूर्णा तालुकाध्यक्ष ओमेश्वर पदमगिरीवार या सभेत होते.
झोपडपट्टीवासीय अतिक्रमणधारकांना जमिनीचे स्थायी पट्टे देणे, वन जमिनीवर शेती करणाऱ्या आदिवासी व इतर बांधवांना जमिनीचे स्थायी पट्टे देणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करणे,
कोल माईन्ससाठी अधिग्रहित केलेल्या जमिनींना सुधारित दराने मोबदला देणे व प्रकल्पग्रस्त कुटूंबातील व्यक्तीला नोकरी देणे, चंद्रपूर शहर पंचशताब्दी अंतर्गत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देणे व त्यासाठी निधी उपलब्ध करून देणे इत्यादी महत्वपूर्ण समस्यांवर चर्चा करण्यात आली.
यापैकी झोपडपट्टीवासियांना व वनजमिनीधारकांना पट्टे वाटपासंबंधीच्या कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
माणिकराव ठाकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरला झालेच पाहिजे, असा आग्रह धरला, तर महापौर संगीता अमृतकर यांनी शहर विकासाकरिता अतिरिक्त शंभर कोटीची मागणी केली.