News Flash

निसर्गाच्या शोषणाने प्रलयाला आमंत्रण

दाटीवाटीने उभ्या केलेल्या इमारती..नाल्यांवर उभ्या-आडव्या कशाही बांधलेल्या चाळी..डोंगरांच्या पायथ्याशी, टेकडय़ांच्या कुशीत, पारसीक डोंगरांच्या हिरव्यागर्द वनराईतून डोके वर काढत उभे राहिलेले काँक्रिटचे बेकायदा इमले..खंगलेल्या, मोडकळीस आलेल्या,

| June 22, 2013 12:07 pm

निसर्गाच्या शोषणाने प्रलयाला आमंत्रण

दाटीवाटीने उभ्या केलेल्या इमारती..नाल्यांवर उभ्या-आडव्या कशाही बांधलेल्या चाळी..डोंगरांच्या पायथ्याशी, टेकडय़ांच्या कुशीत, पारसीक डोंगरांच्या हिरव्यागर्द वनराईतून डोके वर काढत उभे राहिलेले काँक्रिटचे बेकायदा इमले..खंगलेल्या, मोडकळीस आलेल्या, कललेल्या आणि कधीही कोसळतील अशा स्थितीत उभ्या असलेल्या इमारतींमधून जीव मुठीत घेऊन जगणारे रहिवाशी..भविष्यातील मोठय़ा आपत्तीला आमंत्रण ठरू शकणारे मुंब्र्यातील हे भयावह वास्तव शुक्रवारी रात्री घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा ठसठशीतपणे पुढे आले आहे. एका बाजूला पारसीक डोंगर रांगेतून तुफान वेगाने वाहत येणारे पावसाचे पाणी तर दुसऱ्या बाजूला अमर्याद अशा रेती उपश्यामुळे खंगत चाललेली खाडी आणि मधोमध अनधिकृपणे उभ्या राहिलेल्या मुंब्र्यात डोंगरांमधून वाहणारे पावसाचे पाणी खाडीपर्यंत पोहचविण्यासाठी नियोजनबद्ध अशा नाल्यांची निर्मितीही अजून झालेली नाही. त्यामुळे बेकायदा, धोकादायक इमल्यांचे मुंब्रा नावाचे हे बेट कधी ढासळेल, याचा काही नेम नाही.  
मुंब्रा रेल्वे स्थानकासमोर असलेली एक तीन मजल्यांची इमारत शुक्रवारी रात्री कोसळली आणि त्याखाली सापडून दहा जणांचा मृत्यू झाला. जेमतेम ३५ वर्षांपूर्वी उभी केलेली स्मृती नावाची ही इमारत एका अर्थाने धोकादायक या सदरातही मोडणारी नव्हती. तरीही ती कोसळली आणि मुंब्र्यात यापेक्षा किती भयानक चित्र निर्माण होऊ शकते याचे प्रत्यंतर एकप्रकारे आले. मुंब्र्यात कुठेही नजर टाकली तर खंगलेल्या, धोकादायक इमारतींच्या रांगा दिसून येतात. शीळ येथील इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका हद्दीतील बेकायदा आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला. शीळ, कौसा, मुंब्रा भागात नव्याने उभ्या राहात असलेल्या बेकायदा इमल्यांचे रॅकेटही त्यामुळे उघड झाले. गेल्या अनेक वर्षांत मुंब्र्यात उभ्या राहिलेल्या बेकायदा इमल्यांचा पाया आता खचू लागल्याचे चित्र शुक्रवारच्या दुर्घटनेनंतर पुढे येऊ लागले आहे. यावर वेळीच उपाय शोधला नाही, तर किती भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची जाणीव मुंब्र्यात फेरफटका मारताना होत राहतो. रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंनी कुठेही नजर टाकल्यास जागोजागी नाल्यांवर उभ्या राहिलेल्या चाळी, इमारतींशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. शैलेशनगर, मदरसा कादरी इलाखा, शिस्तीयानगर या पट्टय़ात बेकायदा पद्धतीने उभ्या राहिलेल्या चाळी, इमारतींच्या रांगा थेट पारसीकच्या डोंगराना भिडल्या आहेत. मुंब्रा रेल्वे स्थानकासमोर खंगलेली आणि कधीही कोसळेल अशा स्थितीतील शामियाना नावाची इमारत मुंब्र्यातील या धोकादायक वास्तवाचे प्रतीक ठरावे, अशा पद्धतीने सर्व शासकीय यंत्रणांना वाकुल्या दाखवत उभी आहे. एका बाजूला खाडी तर दुसऱ्या बाजूला डोंगर अशा निसर्गाच्या कुशीत असलेल्या मुंब्र्यात जागोजागी पर्यावरणाचे अमर्याद असे शोषण सुरू आहे. त्याचा फटकाही आता येथील रहिवाशांना बसू लागला आहे. पावसाळ्यात पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारा पारसीकचा डोंगर येथील रहिवाशांसाठी कर्दनकाळ ठरू लागला आहे. या डोंगरांमधून तुफान वेगात वाहत येणारे पावसाच्या पाण्याचे लोट मुंब्र्यात अनेक ठिकाणी मोडकळीस आलेल्या नाल्यांमधून घराघरात शिरतात आणि भविष्यात घडणाऱ्या मोठय़ा दुर्घटनेची चाहुल लागल्याशिवाय राहात नाही. दुसऱ्या बाजूला बेकायदा पद्धतीने सुरू असलेल्या अमर्याद अशा रेती उपशामुळे खाडीच्या पोटात खड्डा पडतो आहे. भूगर्भात सुरू असलेल्या हालचालींमुळे आधीच भराव टाकून उभ्या राहिलेल्या मुंब्र्यातील इमारतींचा पाया खचू लागल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. जमेल त्या मार्गाने आणि चोहीकडून सुरू असलेले निसर्गाचे हे शोषण मुंब्र्यात भल्यामोठय़ा आपत्तीला एकप्रकारे निमंत्रण देऊ लागले आहे. शुक्रवारी रात्री घडलेली इमारत दुर्घटना भविष्यातील प्रलयाची नांदी ठरते की काय, अशी भीती म्हणूनच जाणकारांमधून व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2013 12:07 pm

Web Title: exploitation with nature invite calamity
टॅग : Disaster
Next Stories
1 मेकओव्हरच्या वल्गना, वरवरच्या मलमपट्टय़ा..!
2 नवी मुंबईत धोकादायक इमारतींचा आकडा गुलदस्त्यातच
3 धोकादायक इमारतीतील रहिवाशांना सिडकोच्या घरांची आशा
Just Now!
X