गेल्या तीन वर्षांपासून पुरेसा पाऊस नसल्याने पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या दाही दिशा फिरून झाल्यानंतर दुष्काळाने झाकूळ झालेला शेतकरी आता पाण्यासाठी भूगर्भाची खोली धुंडाळताना दिसत आहे.
एकमेव पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीव्यवसायासाठी शेतकरी सातत्याने पाण्याच्या शोधात राहिला आहे. परंतु गेली तीन-चार वर्षे पावसानेच पाठ फिरवल्याने जमिनीतच पाणी राहिले नाही. परंतु तरीही शेतकरी वेगवेगळ प्रयोग हाताळताना दिसत आहे. मात्र त्याचा सगळेच गैरफायदा उठवत असल्याने बुडत्या शेतकऱ्यांचा पाय अधिकच खोलात जाताना दिसत आहे.
शेतकरी पाण्याच्या शोधात असल्याचे पाहून तामिळनाडूतील अनेक व्यावसायिक जमिनीत उभी बोअर खोदणारी महागडी यंत्रे घेऊन जानेवारीमध्येच दाखल झाले आहेत. या यंत्राच्या एक फूट खोदाईस ६० ते ६२ रुपये मोजावे लागताहेत. या भागातील पाण्याची पातळी ६०० फुटांपेक्षा जादा खालावली असली व ही खोदाई एवढी महागडी असली तरीही शेतकरी लाखो रुपये खर्चून नशिबाची परीक्षा घेताना दिसत आहेत. या बोअर व्यावसायिकांनी गरजू शेतकरी गाठून देणारे एजंट गावोगावी नेमले आहेत. दादावजा असणारे हे एजंट त्यांना शेतकऱ्याकडील रक्कम वसूल करून देतात. या मोबदल्यात मिळणाऱ्या कमिशनवर हे एजंट मालामाल झाले आहेत. या बोअरमध्ये शेतकऱ्यास पाणी मिळो न मिळो, त्यांची संपूर्ण रक्कम मोजावीच लागते. विशेष म्हणजे या व्यवहारात कसलीही सूट मिळत नाही.
विहिरीच्या भिंतीतील पाझरणारे पाणी एकत्रित करण्याबरोबरचे पाण्याच्या नवीन झऱ्यांच्या अपेक्षेने शेतकरी विहिरीच्या भिंतीत आडवे बोअर घेण्याचाही प्रयोग शेतकरी मोठय़ा प्रमाणात हाताळताना दिसत आहे. या प्रकारास असणारी वाढती मागणी पाहून कॉम्प्रेसरने आडवे बोअर घेणारी यंत्रे व्यावसायिकांनी आणली आहेत. मात्र त्यासाठी शेतकऱ्यास प्रतिफूट १२० ते १३० रुपये मोजावे लागत आहेत. मात्र साध्या यंत्राने हे काम केल्यास त्यासाठी ७० ते ८० रुपये प्रतिफुटाप्रमाणे मोजावे लागत आहेत.
नवीन विहीर खोदणे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे होऊन बसले आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत काम करण्यासाठी मजुरांना २५० ते ३०० रुपये मजुरी द्यावी लागत आहे. तर विहिरीतील खोदलेले दगड बाहेर काढणाऱ्या यारी या यंत्राला दररोज किमान १ हजार रुपये भाडे मोजावे लागत आहेत. पाणी उपसणाऱ्या इंजिनसाठी प्रतिदिनी ३०० ते ४०० रुपये भाडे भरावे लागत आहे. त्यासाठी लागणारे पेट्रोल, डिझेल या इंधनासाठी पैसे खर्च करण्याबरोबरच ते मिळवण्यासाठी काढाव्या लागणाऱ्या नाकदुऱ्या वेगळय़ाच असतात. विहिरीतील मोठमोठे दगड खडक फोडण्यासाठी सुरुंग घ्यावे लागतात. त्यासाठीही एका सुरुंगास ४५ ते ५० रुपये द्यावे लागत आहेत.
मजुरांकडून विहीर खोदाईस उशीर लागतो व खर्च वाढतो. त्यामुळे जेसीबी, पोकलेन अशा यंत्राद्वारेही शेतकरी विहीर खोदाईची कामे करत आहेत. जेसीबीसाठी शेतकऱ्यांना प्रतितास ७०० ते ८०० रुपये तर पोकलेनसाठी २२०० ते २३०० रुपये प्रतितासासाठी मोजावे लागत आहेत. शिवाय अलीकडे विहीर खोदाईमध्ये बोअरब्लास्ट हाही नवीन प्रकार आला असून, त्याद्वारेही खोदाईचे काम लवकर पूर्ण होते. मात्र ५ बाय ५ फुटांच्या अंतराने व १२ ते १६ फूट खोलीपर्यंतच्या या बोअरच्या प्रतिफुटासाठी शेतकऱ्यांना १९० ते २०० रुपये मोजावे लागत आहेत. यासारखा आणखी कुणी काही प्रयोग सांगितला तरी शेतकरी त्यासाठी वाटेल ते करण्यास तयार होतात.
शेतकऱ्यांच्या या परिस्थितीत जमिनीतील पाण्याचा वर अंदाज देणारे ‘पानाडी’ या वर्गाचे चांगलेच फावले आहे. कोणी रक्तगट व नारळाचा आधार घेते तर कुणी लोखंडी गजाच्या आधारे जमिनीतील पाण्याचा अंदाज वर्तवीत आहेत. काही चलाख लोक तर काही माहीत नसताना किंवा कळत नसतानाही जमिनीत पाणी असल्याचे सांगून शेतकऱ्यांना गंडा घालताना दिसत आहेत. अगतिक शेतकरी जमिनीत पाणी नसताना देवाला नवससायास करून, कुणाच्याही भूलथापांनाही बळी पडत भूगर्भाची खोली धुंडाळत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2013 रोजी प्रकाशित
पाण्यासाठी शेतकरी शोधू लागले भूगर्भाची खोली
गेल्या तीन वर्षांपासून पुरेसा पाऊस नसल्याने पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या दाही दिशा फिरून झाल्यानंतर दुष्काळाने झाकूळ झालेला शेतकरी आता पाण्यासाठी भूगर्भाची खोली धुंडाळताना दिसत आहे.

First published on: 12-04-2013 at 01:15 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer finding depth of bowels of the earths for water