पावसाने या वर्षी  बऱ्याच वर्षांनंतर मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरच सुरुवात केली असून शेतकरी सुखावला होता. त्यामुळे वर्षभर अंगमेहनत करून केलेल्या शेतातील मशागतीला पावसापूर्वी पेरलेल्या बियांतून पहिल्याचा पावसामुळे धरतीच्या उदरातून अंकुर फुटला आहे. या अंकुरलेल्या काळ्या मातीवरील हिरवीगार चादर मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने काळवंडून नष्ट होण्याची भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. अपार मेहनतीने आलेल्या या अंकुराला टिकविण्यासासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले असले तरी पावसाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.
उरण तालुक्यातील पूर्व विभागात शेतीवर वर्षवर कष्ट करून मेहनत करून भाताचे पीक घेतले जाते. येथील सारडे, पिरकोन, वशेणी, आवरे, पाले, मोठी जुई, चिरनेर, कळंबुसरे, पाणदिवे, कोप्रोली, खोपटे या गावांच्या परिसरातील शेतीत सध्या भाताच्या सुक्या पेरणीला अंकुर फुटल्याने पहिल्याच पावसानंतर शेतकऱ्याचा मेहनतीला फळ आल्याचा सुखद आनंद आहे. खाडीकिनारी असली तरी काही ठिकाणी गोडय़ा मातीच्या  जमिनीत पाणी मुरलेले असल्याने अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारलेली असली तरी भातशेतीला फुटलेले अंकुर कायम आहेत.
याच पिकाचा वापर शेती लावण्यासाठी केला जात असल्याने आलेले पीक नष्ट झाल्यास शेतकऱ्यांवर फेरपेरणीची पाळी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीचा हंगामही लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे उरण परिसरात येत्या दोन ते तीन दिवसात पावसाच्या सरी कोसळल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे सध्या येथील शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत असून आपल्या परीने आलेले पीक वाया जाऊ नये यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती मोठी जुई येथील शेतकरी नितेश पंडित यांनी दिली.