राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठातील विसंवादाचा फटका गडचिरोलीच्या मॉडेल कॉलेजला बसला असून या वर्षी त्या ठिकाणी एकही प्रवेश न झाल्याची धक्कादायक माहिती विधिसभेत सादर करण्यात आली.
विद्यापीठ अनुदान आयोगाने गडचिरोलीसारख्या दुर्लक्षित, दुर्गम भागातील लोकांचा विकास आणि विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील टक्का वाढावा म्हणून मॉडेल कॉलेज देऊ केले. मॉडेल कॉलेज यूजीसी व राज्य शासनाचा संयुक्त उपक्रम असून ते नागपूर विद्यापीठाशी संलग्नित आहे. त्यासाठी यूजीसीने साडेआठ कोटींचे अनुदान देऊ केले होते. गेल्या तीन वर्षांपासून मॉडेल कॉलेजच्या भरभराटीसाठी आलेल्या पैशाचा उपयोग अद्याप विद्यार्थ्यांना उपयोगी पडला नसल्याचे विधिसभा चर्चेतून निष्पन्न झाले.
मॉडेल कॉलेज मिळाल्यानंतर चंद्रपूर व गडचिरोलीसाठी गोंडवाना विद्यापीठ स्थापन होऊन १७९ महाविद्यालये गोंडवाना विद्यापीठाला संलग्नित करण्यात आली.
त्यामुळे गडचिरोलीच्या इतर महाविद्यालयांबरोबरच मॉडेल कॉलेजचाही ताबा गोंडवाना विद्यापीठाला मिळावा, अशी तेथील कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांची इच्छा असून त्यांच्याच निर्देशाने गेल्या जूनमध्ये गोंडवानाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी नागपूर विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेजचे प्राचार्य व उपकेंद्राचे संचालक डॉ. जगनाडे यांच्या कक्षाला कुलूप ठोकले होते. या घटनेची तक्रार राज्याच्या उच्चशिक्षण प्रधान सचिवांकडे करण्यात आली होती. तेव्हापासून ही धुसफूस असून दोन्ही विद्यापीठांतील विसंवाद कायम आहे.
पूर्वी हे कॉलेज गडचिरोली उपकेंद्रात सुरू होते. आता विद्यापीठच वेगळे झाल्याने उपकेंद्रातील मॉडेल कॉलेजसाठी गेल्या तीन वर्षांपासून नागपूर विद्यापीठाला जागा मिळू शकली नाही, हे मागच्याही विधिसभेत सांगण्यात आले होते. यासंदर्भात आजच्या विधिसभेत यापूर्वीच्या विधिसभेचे कार्यवृत्त मंजूर करताना मॉडेल कॉलेजच्या संदर्भात आतापर्यंत कोणती कार्यवाही विद्यापीठाने पार पाडली, असा प्रश्न विधिसभा सदस्य प्रकाश गेडाम यांनी उपस्थित केला होता. मात्र, याच वेळी ज्येष्ठ विधिसभा सदस्य विजय मोगरे यांनी मॉडेल कॉलेजची दुरवस्था आणि त्या ठिकाणी कॉलेज उभेच राहून नये, यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा पाढाच वाचला. ते कॉलेज नागपूर विद्यापीठाने चालवूच नये, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे. त्या ठिकाणी या वर्षी एकही प्रवेश झाला नसल्याची धक्कादायक माहिती दिली. चर्चेत भाग घेताना अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी मॉडेल कॉलेज गोंडवाना विद्यापीठाला हस्तांतरित होऊ शकत नसल्याची तांत्रिक अडचण सांगितली. यासंदर्भात विधिसभा अध्यक्ष डॉ. विलास सपकाळ यांनी विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेजसाठी प्रशासनाचे गंभीर प्रयत्न सुरू असून मॉडेल कॉलेजसाठी जागा मिळाली असून त्यासंबंधीचा करारनामा लवकरच होईल, असे आश्वासन दिले.