लोकमान्य टिळकांच्या काळातील सार्वजानिक गणेशोत्सवाचे स्वरुप आता आकर्षक रोषणाई, भव्य दिव्य देखावे आणि डीजेच्या कलकलाटमुळे सपशेल बदलले आहे. नियमांचे उल्लंघन करून डीजे मोठय़ा आवाजात वाजवण्यात येत असल्याने त्याचा सर्वसामान्यांना त्रास होतो. हे चित्र सार्वत्रिक असले तरी शहरातील काही गणेशमंडळे मात्र याला अपवाद ठरली आहेत.
डीजेच्या ध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची पुरेशी कल्पना असतानाही मंडळाचे आयोजक सहजपणे आवाजाच्या सीमारेषा ओलांडतात. कमी ऐकू येण्यापासून ते बहिरेपणा अशा स्वरूपाचे दोष या प्रदूषणामुळे दिसून येतात, शिवाय चिडचिड, अस्वस्थता, छातीत धडधड होणे, मन बेचैन होणे, तणाव वाढणे, एकाग्रता ढळणे आदी अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना त्याचा जास्त त्रास होतो. पोलीस विभागातर्फे डीजेवर नियंत्रण आणण्यासाठी नेहमीप्रमाणे कारवाईचा इशारा दिला जातो, मात्र प्रत्यक्षात कारवाईचे प्रमाण अत्यल्प आहे.
या पाश्र्वभूमीवर शहरातील काही गणेशमंडळांत डीजेशिवाय गणेशोत्सव साजरा केला जात असून त्यांनी ते वेगळेपण जपले आहे. एकशेवीस वर्षांचा इतिहास असलेल्या राजाराम वाचनालयातील गणेशोत्सव मंडळाने समाजप्रबोधन ते व्यावसायिकीकरण अशी वळणे घेत अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातही मानाचे स्थान मिळविले आहे. विघ्नहर्त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून केल्या जाणाऱ्या विधि-विधानांच्या पलिकडे जाऊन समाजप्रबोधन साधण्याचा प्रयत्न वाचनालय करीत आहे. परिसंवाद, वादविवाद, व्याख्यानांसह नव्या पिढीला रुचणारे सांस्कृतिक कार्यक्रम समाजप्रबोधन हा हेतू ठेवून केले जात आहेत. काळानुसार गणेशोत्सवातील कार्यक्रमाचे स्वरूप बदलले असले तरी राजाराम वाचनालयाने मात्र पूर्वीची परंपरा आजही कायम ठेवली आहे.
जुनी मंगळवारी परिसरात गेल्या ६० वर्षांपासून सुरू असलेल्या सार्वजानिक गणेशमंडळात वारकरी भजन, कीर्तनाशिवाय समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या भागातच भोसलेकालीन गांडल्याचा गणपती असून त्यांच्याकडे सुद्धा पारंपारिक पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर दहा दिवस भजन, कीर्तन, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमासोबतच सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. भगवान नगरमध्ये बाल गणेशमंडळात व्यसन मुक्ती या विषयावर जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. शिवाय रक्तदान, नेत्रतपासणी शिबीर या मंडळाने आयोजित केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून मंडळात सामाजिक उपक्रम राबविले जात असताना डीजे हा प्रकार आजपर्यंत मंडळात लावण्यात आला नसल्याचे मंडळाचे सदस्य वैभव काणे यांनी सांगितले. नरेंद्रनगर गणेशोत्सव मंडळातर्फे गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. दहा दिवसांत एक सामूहिक अथर्वशीर्ष पारायण महिलांच्या भजन मंडळाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इतवारी भागात संती गणेशोत्सव मंडळातसुद्धा केवळ गणपतीची मिरवणूक सोडली तर दहा दिवस डीजे लावला जात नसल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.