नवी मुंबई, मुंबई, ठाणे व रायगड या चार जिल्ह्य़ांत टोळी सक्रिय
परराज्यातील व्यक्तींना वाहन परवाना पुरवणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात उरण पोलिसांना यश आले आहे. हे सर्व परवाने बनावट असल्याचे तपासात समोर आले असून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून परवाने तयार करण्याचे साहित्यदेखील जप्त करण्यात आले आहे. या टोळीतील आणखी एकाचा शोध उरण पोलीस घेत आहेत. काही महिन्यापूर्वी नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेने बनावट परवाना तयार करणारी टोळीचा पदाफार्श केला होता. 

नवी मुंबईतील गणेश फॉवर्डर्स या कंपनीतील वाहनचालक ध्यानसिंग छत्रपाल सिंग याने मालाचा अपहार केल्याचा गुन्ह्य़ाचा तपास उरण पोलीस करीत होते.या प्रकरणात सिंग याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील वाहन परवाने आढळ्याने पोलिसांचा संशय बळावला व परवाने बनावट असल्याचे अधिक तपास समोर आले.
या प्रकरणी अधिक चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल राधेश्याम मिश्रा (रा.फुंडे,मुळगाव आजमगड उत्तर प्रदेश), सिंगारासिंग बाजवा,(रा.जासई,मु़ळगाव पंजाब) दलवीर सिंग रामसिंग (रा.सोनारी,मुळगाव अमृतसर पंजाब), रंजित कुमार निर्मलकुमार घोष (रा.चेंबूर मुंबई मुळगांव पश्चिम बंगाल) यांना अटक करण्यात आलेली आहे.
बनावट वाहन परवाने तयार करून त्याची विक्री करणारी ही टोळी मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड या चार जिल्ह्य़ात सक्रिय होती. या प्रकरणातील आणखी एका आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गालांडे यांनी दिली आहे. आरोपीकडून महाराष्ट्रातील बनावट वाहन परवाने हस्तगत करण्यात आलेले आहेत. तसेच आरटीओचे रबरी शिक्के, अर्ज आदी साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी संतोष सावंत यांनी दिली आहे.