शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या कनक र्सिोसेस कंपनीने प्रत्येक वस्तीमध्ये दररोज पाठविण्यात येणाऱ्या गाडय़ांची संख्या, प्रत्यक्षात केलेली नोंद आणि त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कंपनीने उचलेला पैसा याबाबत महापालिका प्रशासनाकडे नोंद नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात दररोज किमान किमान ८०० टन कचरा उचलला जात असल्याची कंपनीने नोंद केली असली तरी प्रत्यक्षात तेवढा कचरा उचलला जात नाही आणि त्यात २०० टन जवळपास माती, वाळू व दगड असल्याचे निदर्शनास आले. मात्र, महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.
शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट २००९ मध्ये कनक र्सिोसेस कंपनीला देण्यात आले असून त्यांच्याशी १० वर्षांचा करार करण्यात आला होता. आता ५ वर्षांचा करार संपल्यानंतर त्यांना पुन्हा पाच वर्षांसाठी प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक असल्यामुळे ती महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. कंपनीला शहरातून दररोज किमान ८०० टन कचरा उचलण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक झोनमधे ४ गाडय़ाची कंपनीने व्यवस्था केली आहे. मात्र, त्या प्रमाणात कचरा उचलला जात नसल्यामुळे विविध वस्त्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. दररोज सकाळी विविध वस्त्यांमध्ये कचऱ्याची गाडी फिरणे आवश्यक असताना अनेक वस्त्यांमध्ये गाडी जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे घरोघरी जमा करण्यात आलेला कचरा दोन दोन दिवस पडलेला असतो, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
कनक रिसोर्सस कंपनीच्या गाडय़ा शहरातील विविध भागात फिरत असून गोळा झालेला कचरा भांडेवाडीला डंपिंग यार्डमध्ये साठवला जातो. मात्र, त्या ठिकाणी दररोज किती कचरा साठवला जातो, किती गाडय़ा येतात याची नोंद नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात कंपनीची मनमानी सुरू आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी सभापती रमेश सिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची बैठक झाली. नागरिकांच्या या संदर्भातील तक्रारी बघता प्रत्येक वस्तीमध्ये दिवसातून किती गाडय़ा पाठविल्या जातात, किती कचरा उचलला जातो यांची कंपनीकडे नोंद आहे. प्रत्यक्षात तेवढा कचरा उचलला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. कंपनीने किती गाडय़ा लावल्या, किती कचरा उचलला, कचरा उचलण्याचे प्रमाण, गाडय़ांची संख्या आणि कचरा न उचलल्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेली दंडात्मक कारवाई या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश आरोग्य सभापती रमेश सिंगारे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्या अहवालावर काय कारवाई झाली, हे मात्र गुलदस्त्यात आहे. पाच महिन्यांपूर्वीा तत्कालीन महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी कनक कंपनीमध्ये असलेला घोळ बघता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यात काही विभागाचे अधिकारी अडकले असल्याचे लक्षात येताच त्यांना आयुक्तांनी नोटीस दिली होती. त्या नोटिसीचे काय झाले? याबाबतचा अहवाल समोर आला नाही. शहरातील कचरा उचलून डंपिंग यार्डमध्ये साठवला जात असताना प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार त्या कचऱ्यांमध्ये किमान २०० ते २५० टन केवळ माती राहत असल्याचे निदर्शनास आले. लोकांकडे साठवून ठेवण्यात आलेला कचरा घेऊन तो एका ठिकाणी साठविण्याचे काम कंपनीकडे दिले असताना अनेक भागात माती आणि वाळू उचलण्याचे काम कंपनीच्या गाडय़ा करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

चौकशी करणार -सिंगारे
या संदर्भात आरोग्य सभापती रमेश सिंगारे यांनी सांगितले, आरोग्य विभागाचा अहवाल आला असून तो तपासून त्यात कंपनी आणि प्रशासनातील अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येईल. शहरात ८०० टन कचरा उचलला जातो की नाही, याबाबत माहिती घेतली जाईल. शिवाय डंपिंग यार्डमध्ये नोंद होते की नाही? याची चौकशी केली जाईल.