नागपूर महानगर संस्कार भारती व पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्यावतीने २१ ते २४ मार्चदरम्यान नववर्षांच्या पर्वावर गीतरामायणाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज संध्याकाळी ६.३० वाजता रामनगर येथील राममंदिराच्या प्रांगणात हे सादरीकरण होईल. संस्कार भारती सलग १३ व्या वर्षी गीतरामायणाचे आयोजन करीत आहे.
नागपुरातील गायन, वादन, नृत्य व नाटय़क्षेत्रातील २०० च्यावर कलावंत या कार्यक्रमात सहभागी होतील. ग.दि.माडगूळकर लिखित व सुधीर फडके यांनी गायलेले हे काव्य नृत्य व नाटय़ कलाकृतींसह सादर केले जाणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते २१ मार्चला सायंकाळी ६.३० ला कार्यक्रमाचे उदम््घाटन होईल. कार्यक्रमाच्या चार दिवसांच्या कालावधीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर प्रवीण दटके, ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ.पी.के. देशपांडे, माजी न्यायाधीश अ‍ॅड. मीरा खडक्कार, उद्योगपती वसंतलाल शॉ, पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ.पीयूषकुमार, नगरसेवक परिणय फुके कार्यक्रमास उपस्थित राहतील.
कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन मुकुंद देशपांडे, विवेक अलोणी, वेदिका पिंपळापुरे, स्मिता खनगई करतील. नृत्यकलेची धुरा स्वाती भालेराव सांभाळणार असून नाटय़ व संहितेची जबाबदारी डॉ. विनोद इंदूरकर, प्रणिता साल्पेकर व दीपाली घोंगे सांभाळणार आहेत. या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचन गडकरी तसेच पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष जयंत आपटे व इतरांनी केले आहे.