नवीन तंत्रज्ञानाला सामोरे जाणारी नवीन पिढी अतिशय प्रगतशील असल्याने सर्व अभ्यासक्रम व्यवसायाला पूरक असावेत आणि विद्यार्थ्यांच्या आवडीचेही असावेत, अशी अपेक्षा येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरूण जामकर यांनी व्यक्त केली आहे. निवृत्त शिक्षकांना सहकार्यासाठी बोलविल्यास ते आनंदाने येतील. व्यवसायधारित अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
सिडकोतील कर्मवीर शांतारामबापू वावरे महाविद्यालयात समाजदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गुरू हा सदैव प्रेरणादायी राहिलेला आहे. कर्मवीरांचे कार्यही तरुणांना सदैव प्रोत्साहित करणारे असल्याचेही डॉ. जामकर यांनी सांगितले. त्यांनी शिक्षणासाठी केलेल्या अडचणींचा प्रवास सर्वासमोर ठेवला. विद्यार्थ्यांच्या मनात खूप प्रश्न असतात. त्यांना शिक्षकांनी उत्तरे द्यावी. त्यांची क्षमता ओळखून मार्गदर्शन करावे असे त्यांनी नमूद केले. डॉ. रावसाहेब शिंदे यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा अवघा इतिहास यावेळी मांडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ, उपप्राचार्य डॉ. आर. के. दातीर, प्रा. एस. आर. निकम यांच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्तविकात त्यांनी कर्मवीर व त्यांच्या कार्याचे स्मरण केले.
यावेळी गुणवंत प्राध्यापक डॉ. वेदश्री थिगळे, डॉ. एन. पी. निकम, शुभांगी गोसावी, डॉ. आर. के. दातीर मीनाक्षी गवळी, योगिता करंजकर, एस. एस. कुलकर्णी, एस. एस. पाटील, राजेश निकम, एस. पी. मोरे, एन, बी. पाटील, डॉ. डी. एन. पवार, के. आर. जाधव आदींचा सत्कार करण्यात आला. २०१३-१४ च्या शैक्षणिक परीक्षेत प्रत्येक वर्गात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रा. एस. टी. घुले, डॉ. एन. पी. निकम, प्रा. जे. टी. पगार, डॉ. सोपान एरंडे यांच्या वतीने गणित, रसायन आणि जीवशास्त्र विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांस ५०१ रूपये देण्यात आले.