पाच दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेवर सुरू झालेल्या पेपरलेस मोबाइल तिकीट योजनेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवापर्यंत २० हजारांहून अधिक प्रवाशांनी मोबाइल तिकिटासाठी असणारे ‘यूटीएस अॅप’ डाउनलोड केले आहे. तर, फक्त रविवारी २१० प्रवाशांनी प्रत्यक्षात मोबाइल तिकीट काढून या योजनेचे स्वागत केले आहे.
तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने पेपरलेस मोबाइल तिकिटांसाठी आग्रह धरला आहे. याचा प्रयोग प्रथम चेन्नईमध्ये करण्यात आला. तेथील छोटय़ा उपनगरीय मार्गावर ही योजना यशस्वी झाल्यानंतर पश्चिम रेल्वेने ही योजना आपल्याकडे आणली. बुधवारी ही योजना सुरू झाल्यानंतर रविवार सायंकाळपर्यंत २०,२८८ प्रवाशांनी हे अॅप डाउनलोड केले. पहिल्याच दिवशी सुमारे १२ हजार प्रवाशांनी मोबाइल अॅप डाउनलोड केले होते. त्यात आता आठ हजारांनी भर पडली आहे. त्याचबरोबर अॅपच्या आधारे प्रत्यक्ष तिकीट काढणाऱ्यांचीही संख्या वाढत चालली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मोबाइल तिकीट काढणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शनिवारी मात्र ५२३ प्रवाशांनी मोबाइलवर तिकिटे काढली होती. त्यातून पश्चिम रेल्वेला ७,३५५ रुपयांचा महसूल मिळाला आहे. ही संख्या येत्या आठवडय़ात आणखी वाढत जाईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.