बडे कलावंत, पंजाबी मानसिकता आणि कधी कधी सगळ्या संस्कृतींचे मिश्रण, अर्थहीन शब्दांची गाणी आणि संधी मिळेल तेव्हा नृत्य-गाणी असा सगळा मसाला तयार करून त्याला देशभक्ती, समाजसेवेचा तकलादू कागदांचा इमला बांधला की हिंदी सिनेमा रुपेरी पडद्यावर सादर केल्याचे समाधान काही निर्माता-दिग्दर्शकांना मिळते. गल्लाभरू हा शब्दही वापरून गुळगुळीत व्हावा इतका रोमँटिक कॉमेडीचा सरधोपट सिनेमांचा सुळसुळाट झाला आहे. ‘गोरी तेरे गाव में’ या सिनेमाद्वारे चित्रपटकर्त्यांनी हा सरधोपटपणा रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा साकारला आहे इतकेच. आणखी एक तकलादू पण टाइमपास रॉमँटिक कॉमेडीपट म्हणावा लागेल.
बॉलीवूडची नंबर वन स्पर्धेतील अभिनेत्री करिना कपूरने दिया ही व्यक्तिरेखा साकारून आपण कोणतीही वेगळ्या प्रकारची छटा असलेली भूमिका साकारू शकतो असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, दिया शर्मा या व्यक्तिरेखेपासून शेकडो योजने दूर असलेली ‘करिना कपूरच’ त्यातून प्रेक्षकांना दिसते.
समाजातील दु:ख, गरिबी यांचा कळवळा असलेली दिया ही पंजाबी व्यक्तिरेखा आणि इम्रान खानने साकारलेला उच्चभ्रू, मस्तवाल दाक्षिणात्य तरुण श्रीराम वेंकट अशी उत्तर-दक्षिण भारताचे प्रतिनिधित्व करणारी जोडी या रोमँटिक कॉमेडी सिनेमात दिग्दर्शकाने दाखवली आहे. फक्त अमेरिकेत शिकून आला म्हणून श्रीराम वेंकटला त्याच्या कुटुंबीयांचा, त्याच्या मातृभाषेचा, संस्कृतीचा अजिबात अभिमान वगैरे नाही तर उलट चीड आहे. दिया आणि श्रीराम या दोन्ही व्यक्तिरेखा अतिश्रीमंत म्हणाव्यात अशा आहेत. खोटा सिनेमा हे बिरुद मिरवून केवळ गल्ला गोळा करायचा हा एकमेव उद्देश निर्माता करण जोहरने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविण्याचा प्रयत्न या सिनेमाद्वारे केला आहे. परंतु, खोटा सिनेमा दाखवितानाही पटकथेची चांगली बांधणी करूनही प्रेक्षकांना सिनेमा असह्य़ होण्यापासून वाचविता येऊ शकले असते.
बंगळुरूमध्ये राहणारा श्रीराम वेंकट हा श्रीमंत कुटुंबातील दाक्षिणात्य तरुण अमेरिकेतून शिकून परत आलाय. तो प्रचंड रिकामटेकडा आहे, सुंदर मुलींच्या मागे लागणे, टाइमपास करणे, जमेल तेव्हा नाच-गाणी करणे, दारू पिणे असे ‘फूल टू’ मस्तीत जगतोय. त्याला अचानक एकदम ‘फिल्मी’ पद्धतीने दिया शर्मा भेटते आणि तो लगेच तिच्या प्रेमात पडतो असे न दाखविता ती त्याला नेहमीच अचानक भेटते आणि काही कारणाने त्यांचे पटत नाही असे दाखविले आहे. नायक-नायिकेची भेट अचानक होणे हे रोमँटिक कॉमेडी सिनेमात पटून जाते, त्याचबरोबर आणखी एक गोष्ट दिग्दर्शकाने चांगल्या प्रकारे ठसविली आहे ती म्हणजे दिया आणि श्रीराम हे दोघेही परस्पर भिन्न विचारांची, उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे प्रतिनिधित्व करणारी, भिन्न वयाची व्यक्तिमत्त्वे आहेत. कालांतराने दियाच्या समाजसेवेच्या वेडापायी आणि भ्रामक आदर्शवादाला कंटाळून दिया-श्रीराम वेगळे होतात, एकमेकांना विसरण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे आपल्या बेकार मुलासाठी श्रीरामचे वडील आपल्या तोलामोलाची तद्दन दाक्षिणात्य संस्कृतीमधील घराण्याची मुलगी पाहतात. घरातल्यांच्या दबावामुळे श्रीराम त्या मुलीला पाहायला जातो आणि त्याला वसुधा आवडते. पण दोघांची एकांतात भेट होते तेव्हा आपले एका सरदारजीवर प्रेम असून तू लग्नाला नकार द्यावास असे ती श्रीरामला सुचविते. पण श्रीराम तसे करीत नाही. दोघांचा साखरपुडा होतो. श्रीराम-दिया यांच्या प्रेमसंबंधाबद्दल श्रीराम वसुधाला सांगत असतानाच चित्रपट उलगडत जातो. दियाला समाजसेवेचे वेड असते. त्यामुळे ती मनाला पटेल तिथे जाऊन लोकांना मदत करायचे काम करत असते. लग्नाच्या बोहल्यावरून श्रीराम पलायन करतो आणि दियाच्या पंजाबमधील घरी जातो. तेव्हा दिया मात्र समाजसेवेसाठी गुजरात-मध्य प्रदेशच्या सीमेवरील एका झुमिली नावाच्या गावात राहत असते. मग तिला परत आणायचे तो ठरवितो. मग सबंध सिनेमा समाजसेवेचे काम, झुमिली गावातील प्रश्न सोडविण्यात जातो आणि त्या अनुषंगाने नायक-नायिकेचे प्रेमही खुलते.
पंजाबी तरुणी-दक्षिणी तरुण, जगण्याचे उद्देश निरनिराळे, आणि त्यात गुजरातमधील एका नदीपल्याडच्या गावातील लोक, त्यांचे प्रश्न यातून रोमँटिक कॉमेडी करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. परंतु, हा ‘फिल्मी’ सिनेमा अधिकच फिल्मी पद्धतीने मांडल्यामुळे अजिबात प्रभावी ठरत नाही. उलट वाट्टेल तेव्हा भयंकर संगीत असलेल्या गाण्यांच्या भडिमारामुळे प्रेक्षकाला उबग येतो.

गोरी तेरे प्यार में
धर्मा प्रॉडक्शन्स
निर्माता – करण जोहर
दिग्दर्शक – पुनित मल्होत्रा
छायालेखक – महेश लिमये
कथा-पटकथा – अर्शद सय्यद, पुनित मल्होत्रा
संगीत – विशाल शेखर
कलावंत – करीना कपूर, इम्रान खान, श्रद्धा कपूर, इशा गुप्ता, निझालगल रवी.