डोंबिवलीत राजाजी रस्त्यावरील स्वामी विवेकानंद शाळेसमोर उभारण्यात आलेली वादग्रस्त अनधिकृत इमारत अखेर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त केली. यासंबंधीची सविस्तर तक्रार एका दक्ष रहिवाशाने महापालिकेत केली होती. या तक्रारपत्रात महापालिकेचे कर्मचारी, काही लोकप्रतिनिधी कसे सहभागी आहेत याचाही उल्लेख होता. या पत्राने पालिकेत खळबळ माजली होती. मंगळवारी दुपारी पालिकेच्या प्रभाग पथकाने हा अनधिकृत टॉवर जमीनदोस्त करण्याची कारवाई केली.
हे बांधकाम तोडले जात असताना एकाही भू-माफियाने पुढे येऊन विरोध करण्याचे धाडस केले नाही. पोलीस बंदोबस्तामुळे सर्वांनीच बघ्याची भूमिका घेतली होती. दक्ष नागरिकाच्या पत्राचा आधार घेऊन लोकसत्ताने मंगळवारी या अनधिकृत टॉवरची बातमी प्रसिद्ध केली होती. पालिकेच्या प्रभाग कार्यालयाने या वृत्ताची दखल घेऊन बुधवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात हा अनधिकृत टॉवर तोडण्याची कारवाई केली.
काही वर्षांपूर्वी महापालिकेनेच या जागेवरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले होते. हाच सांगाडा पुन्हा जमीनदोस्त करून जमीनमालक आणि भू-माफियांनी संगनमत करून दोन महिन्यात नव्याने अनधिकृत बांधकाम उभे केले होते. पालिकेच्या कोणत्याही मंजुऱ्या त्यासाठी घेण्यात आल्या नव्हत्या.  पालिकेच्या ग प्रभागाचे चंदुलाल पारचे यांच्या पथकाने धडक कारवाई करून हे बांधकाम तोडून टाकले. आता आयरे, कोपर परिसरातील अनधिकृत चाळींवर पारचे यांचा हातोडा केव्हा पडणार अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.