येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा २१ वरून तब्बल ८४ होणार आहेत. त्यासाठी नवी दिल्ली येथील सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनच्या (सीसीआयएम) एका चमुने नुकतेच महाविद्यालयाचे निरीक्षण केले असून या वाढीव जागांना निश्चित मंजुरी मिळेल, अशी आशा महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रशासनाला आहे.
भारतात आजही कोटय़वधी रुग्ण आयुर्वेद पद्धतीनेच उपचार करतात. आयुर्वेदात मोठय़ा प्रमाणात संशोधन होऊन झपाटय़ाने विकास होण्याची गरज होती. शासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, परंतु आता मात्र चांगले दिवस येत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात पदव्युत्तरच्या ९ विषयात केवळ २१ जागा आहेत. वाढती मागणी लक्षात घेता प्रशासनाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा २१ वरून ८४ कराव्या, असा प्रस्ताव सीसीआयएम व शासनाकडे पाठवला. त्यात ९ विषयात आणखी ५४ जागा, तसेच ५ विषयात ९ जागा वाढवण्याचा समावेश आहे.
हा प्रस्ताव मिळताच सीसीआयएमच्या चमुने नागपुरात येऊन महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व विभागांचे निरीक्षण केले. दोन दिवस ही चमू तळ ठोकून होती. ही चमू आपला अहवाल सीसीआयएमकडे सोपवेल. यानंतर पुन्हा एक चमू तपासणीसाठी येईल. ही चमू आपला अहवाल आयुष या संस्थेकडे पाठवेल. यानंतरच या वाढीव जागांना मंजुरी मिळेल. या जागा वाढल्यानंतर त्याचा लाभ पदवीधर विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सध्या अनेक खासगी आयुर्वेद महाविद्यालयात विविध विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांची कमतरता असल्याने ती भरून निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महाविद्यालयात सध्या १८० खाटांची व्यवस्था आहे. त्यात आणखी ८० जागा वाढवून २६० कराव्या, असा प्रस्तावही रुग्णालय प्रशासनाने शासन आणि आयुषकडे पाठवला आहे.
मंजुरी मिळेल : महाविद्यालय व रुग्णालयातील एकूण १४ विषयातील एम.डी. व एम.एस.च्या ६३ जागांना लवकरच मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. महाविद्यालयातील सर्व विभाग सक्षम आहेत. काही विभागात असलेल्या त्रुटी दूर करण्यात येईल. वाढीव जागांना मंजुरी मिळाल्यास नवीन प्राध्यापक मंडळी तयार होतील. विदर्भासोबतच संपूर्ण राज्यातील पदवीधर विद्यार्थ्यांना एम.डी. किंवा एम.एस. करण्याची संधी प्राप्त होईल. रुग्णसेवेच्या दर्जात वाढ होईल. आयुर्वेदामध्ये नवीन संशोधन होतील. – डॉ. गणेश मुक्कावार, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर