आपल्या गोडीने देशासह परदेशातील नागरिकांना भुरळ घालणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष बागांना अखेरच्या टप्प्यापर्यंत अस्मानी सुलतानीचा तडाखा बसल्याने यंदा निर्यातीचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याने घटणार असल्याची भीती उत्पादक व्यक्त करत आहेत. मागील वर्षी मार्चच्या मध्यापर्यंत २७०० पेक्षा अधिक कंटेनर म्हणजे ३२ हजार मेट्रीक टन द्राक्ष नाशिकमधून परदेशी पाठविण्यात आली होती. तुलनेत यंदा केवळ २४ हजार मेट्रीक टनची निर्यात झाली आहे. ज्या वेळी निर्यातीचा वेग वाढतो, नेमक्या त्याच वेळी पुन्हा गारपीट आणि अवकाळी पावसाचे संकट कोसळल्याने पुढील काळात नाशिकची द्राक्ष निर्यात होणे अवघड असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील सर्वच द्राक्षबागा डिसेंबरपासून नैसर्गिक आपत्तीच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. मागील चार महिन्यात दहा ते बारा वेळा हे संकट कोसळले. याआधीच्या आपत्तीतुन बचावलेल्या द्राक्ष बागांवर उत्पादकांनी पुढील काळात बराच खर्च केला. यामुळे नेहमीच्या तुलनेत उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाली. ज्यावेळी ही द्राक्ष निर्यात होण्याची वेळ आली, तेव्हा गारपीट व अवकाळी पावसाने सर्व उद्ध्वस्त झाल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. सलग पाच दिवस झालेल्या अवकाळी पावसात २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात द्राक्षांचे प्रमाण अधिक आहे. देशातील एकूण द्राक्ष उत्पादनात निम्मा वाटा राखणारी नाशिकची द्राक्षे निर्यातीत ७० टक्के हिस्सा काबीज करतात. देशांतर्गत व परदेशातील खवय्यांचे चोचले पुरविणारी ही द्राक्ष यंदा नैसर्गिक आपत्तीच्या फेऱ्यात सापडली. ज्या भागात निर्यातक्षम दर्जाची द्राक्ष होतात, त्या निफाड, िदडोरी तालुक्यातील हजारो एकरवरील बागा आतापर्यंत भुईसपाट झाल्या आहेत. द्राक्ष बागेची उभारणी आणि संगोपन हे अतिशय खर्चिक काम आहे. निर्यातक्षम द्राक्षांची तळहातावरील फोडाप्रमाणे जपवणूक करावी लागते. यासाठी कर्ज काढून मोठी गुंतवणूक करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचे एका झटक्यात होत्याचे नव्हते झाल्याचे द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी सांगितले.
जिल्ह्यात सुमारे एक लाख ६० हजार एकर क्षेत्रावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. याद्वारे दरवर्षी एक लाख ६० हजार मेट्रीक टन द्राक्ष उत्पादीत होतात. यंदा सर्व बागा चार ते पाच महिन्यांपासून नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडल्या. यामुळे मालाचे वजनही घटले. त्यांना वाचविण्यासाठी उत्पादकांनी बराच खर्च केला आहे. पण, जेव्हा माल बाजारात अधिक स्वरूपात जाण्यास सुरूवात झाली, तेव्हा सलग पाच दिवस गारपीट व पाऊस झाला. यामुळे हाती येणाऱ्या उत्पादनाला हजारो उत्पादक मुकले आहेत.
या सर्वाचा फटका निर्यातीला बसणार आहे. भारतातून गतवर्षी एक लाख ९२ हजार मेट्रीक टन द्राक्ष निर्यात झाली होती. त्यामध्ये युरोपात ६५ हजार, रशिया २४ हजार मेट्रीक टन तर उर्वरित द्राक्ष जगातील इतर राष्ट्रांत पाठविण्यात आली.
देशाला मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्ष उत्पादनात जवळपास ५० टक्के घट होणार असल्याचा अंदाज भोसले यांनी व्यक्त केला. देशातून निर्यात होणाऱ्या एकूण द्राक्षांमध्ये नाशिकचा ७० टक्के हिस्सा आहे. मार्चच्या मध्यापर्यंत यंदा २४ हजार कंटेनर द्राक्ष निर्यात झाली. गतवर्षी हे प्रमाण २७ हजार कंटेनरच्या पुढे होते. दोन्ही वर्षांची तुलना केल्यास मागील वर्षीच्या तुलनेत आठ हजार मेट्रीक टन घट झाली आहे. गारपिटीने इतके नुकसान केले की, पुढील काळात फारशी निर्यात होण्याची शक्यता नाही. उत्पादक सर्व बाजुंनी कोंडीत पकडला गेला असून पुढील दोन वर्ष या बागांमधून चांगले उत्पादन येणार नसल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
द्राक्ष निर्यातीतील घट होण्याचा परिणाम देशाला दरवर्षी मिळणारे परकीय चलन कमी होण्यात होईल, याकडे जाणकार लक्ष वेधत आहेत.