20 September 2020

News Flash

काँक्रिटच्या जंगलात पुन्हा हिरवाई

मुंबई उच्च न्यायालयाच्या दट्टय़ामुळे राज्य सरकारने खारफुटीला सरंक्षण देताना अनेक उपाययोजना केल्याने आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण भागात खारफुटीचे प्रमाण वाढले असून या

| June 27, 2013 04:56 am

मुंबई उच्च न्यायालयाच्या दट्टय़ामुळे राज्य सरकारने खारफुटीला सरंक्षण देताना अनेक उपाययोजना केल्याने आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण भागात खारफुटीचे प्रमाण वाढले असून या खारफुटीमुळे जैवविविधताही वाढू लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच खारफुटीच्या हिरव्यागार जंगलात नागरीकरणामुळे नामशेष झालेले कोल्हे, मुंगूस, विविध प्रकारचे साप, अन्य सरपटणारे प्राणी, कीटक, पक्षी आणि माश्यांची पैदास यांचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात आढळून येऊ लागले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब आनंदाची असली तरी नागरी वस्तीत येणाऱ्या या प्राण्यांमुळे मानवी प्राण्याची चिंता मात्र वाढली आहे.
मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्य़ातील मूळ रहिवासी असणारे आगरी कोळी बांधव यापूर्वी सरपणासाठी मोठय़ा प्रमाणात खारफुटीची तोड करीत होते. मुंबई उच्च न्यायालय, केंद्र तसेच राज्य सरकारने केलेल्या विविध कायद्यांमुळे खारफुटीला आता चांगल्या प्रकारे सरंक्षण मिळाले आहे. सरकारने हे संरक्षित वन क्षेत्र जाहीर केल्याने अनेक ठिकाणी खारफुटी आणि नागरी वसाहतीच्या मध्ये हिरवे-पांढऱ्या रंगाचे खांब बसविण्यात आले आहेत. समुद्र आणि मानवी वसाहत यांच्यामध्ये हिरवी भिंत बनून राहणाऱ्या या खारफुटीच्या वाढीसाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. नैर्सगिकरीत्या झाडावरून पडणाऱ्या अंकुरातून या रोपटय़ाची निर्मिती भरतीने वाहून जाणाऱ्या दलदलीच्या ठिकाणी होते. त्यामुळे सरपणासाठी होणारी तोड बंद झाल्याने या झाडांचे आता चांगले बहरणारे वृक्ष तयार झाले आहेत. खाडीकिनारी ही वनस्पती आता १२ मीटरपेक्षा उंच वाढली असल्याचे दिसून येत आहे. जाळीदार फांद्या, अंडाकृती चिवट पाने, फुलांच्या झुबक्यांनी आच्छादलेली, लाल तपकरी रंगाची फळे अशी खारफुटीच्या घनदाट जंगलामुळे  मुंबईच्या आसपास येणाऱ्या सात हजार हेक्टर खारफुटी क्षेत्रात सध्या विविध प्रकारचे खेकडे, साप, कोल्हे, लांडगे, मुंगूस, सरपटणारे अन्य प्राणी, विविध प्रकारचे मंजूळ आवाज करणारे पक्षी, पुलपाखरे आढळून येऊ लागले आहेत. हे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढल्याची माहिती पर्यावरण क्षेत्रात गेली वीस वर्षे काम करणाऱ्या प्रशांत महाजन यांनी दिली. काही महिन्यांपूर्वी कोपरखैरणे येथील नागरी वसाहतीत जवळच्या खारफुटीमधून आलेल्या कोल्ह्य़ाचे दर्शन अनेक नागरिकांना झाले होते. पावसाळ्याच्या या दिवसात सध्या खेकडे मिळण्याचे प्रमाण वाढल्याचे कोळी बांधव आनंदाने सांगत आहेत. खारफुटीची जागा ही माश्यांच्या प्रजनानासाठी संरक्षित जागा असल्याने त्या ठिकाणी आता माश्यांची पैदास वाढू लागली आहे. सकाळी मॉर्निग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना पक्ष्यांचे विविध आवाज साद घालीत आहेत. यात कोकिळा, कवडे, पर्पल हेरॉन, वेस्टर्न रिफ इग्रेट, गॉडविट, किंगफिशर या पक्ष्यांचा समावेश आहे. खारफुटी झाडांची मुळे व फांद्या आता चांगलीच वाढल्याने त्यांचे खाडीकिनारी घट्ट बांध तयार झाले आहेत. त्यामुळे खाडीत येणारा कचरा या झाडामुळे अडवला जात आहे. स्थानिक प्राधिकरणांनी तो पावसाळ्यानंतर साफ करण्याची आवश्यकता आहे.
राज्य सरकारने खारफुटीला यापूर्वी संरक्षित वनाचा दर्जा दिला होता. पण आता ते राखीव वन करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे खारफुटीचे एक मोठे बेट राज्यातील १८६ किलोमीटर क्षेत्रात उभे राहणार आहे.
राज्य सरकारने खारफुटीला यापूर्वी संरक्षित वनाचा दर्जा दिला होता. पण आता ते राखीव वन करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे खारफुटीचे एक मोठे बेट राज्यातील १८६ किलोमीटर क्षेत्रात उभे राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 4:56 am

Web Title: greenery return in concrete jungle
टॅग Greenery
Next Stories
1 लोकमान्य परिसरातील रस्त्याला भगदाड
2 सहाय्यक नगर रचनाकारांविरोधात मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार
3 कोटींचे घर, पण पाण्यासाठी टँकर!
Just Now!
X