दररोजच्या धावपळीत सण उत्सवाचे उत्साहही आता कमी होत चालला आहे. एकमेकांना भेटून प्रत्यक्षात सणाच्या शुभेच्छा देणे आता जमेलच असे नाही. सोशल मीडियाने सणांच्या शुभेच्छा देण्याचा नवा ट्रेंड बाजारात आणल्याने गुरुवारी संक्रांतीचे लाडू आणि हलव्याच्या बाजारपेठांमध्ये मात्र शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे संक्रांतीच्या शुभेच्छांचा गोडवा बाजारपेठांपेक्षा व्हाटस्अ‍ॅपवर अधिक चाखायला मिळाला.
संक्रांत म्हणजे एकमेकांना भेटून तीळगूळ देत नात्यातील गोडवा वाढविण्याचा सण. ही परंपरा आता लोप पावू लागली आहे. पूर्वी सणाला किमान शेजारच्या मंडळींना शुभेच्छा देण्यासाठी भेटीगाठी घडत असत. सोशल मीडियामुळे शुभेच्छा देण्याचा ट्रेंड आता बदलू लागला आहे. ‘तीळगूळ घ्या गोड गोड बोला,’ असे संदेश पाठवीत एकमेकांना काटेरी हलवा व तीळगुळाचे लाडूच्या इमेज पाठवून अनेकांनी गुरुवारी संक्रांत साजरी केली.
सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या की पुढे फारसे करावे लागत नाही. त्यामुळे विक्रेत्यांकडेही आज लाडू व हलवा घेण्यासाठी गर्दी दिसून आली नाही.

ठाणे, डोंबिवलीतील बाजारपेठांमध्ये तिळाचे लाडू  गुरुवारी ७० रुपये पाव किलो या दराने विकले गेले, तर तिळाची वडी १०० ग्रामसाठी ३० रुपयांनी मिळत होती. काटेरी हलवा ६० रुपये पाव किलोने विक्रीसाठी उपलब्ध होता. दरम्यान, यंदाच्या वर्षी लाडू विकत घेण्यासाठी ग्राहकांचा फारसा उत्साह दिसून आला नाही, अशी माहिती डोंबिवलीतील विक्रेते गणेश लाड यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्केही खरेदी झाली नाही, अशा तक्रारीही काही विक्रेत्यांनी केल्या.