23 September 2020

News Flash

वादळ वाऱ्यासह घननिळा धो धो बरसला..

रिमझिम धून.. आभाळ भरून.. सौमित्र या नावाने कविता करणाऱ्या किशोर कदमांच्या ओळी पावसाळयात नेमक्या ओठी येतात.

| April 15, 2015 08:53 am

रिमझिम धून.. आभाळ भरून.. सौमित्र या नावाने कविता करणाऱ्या किशोर कदमांच्या ओळी पावसाळयात नेमक्या ओठी येतात. आता पावसाळा नाही, पण सौमित्रांच्या या ओळींची आठवण अवकाळी बरसणाऱ्या पावसाने करून दिली. शाळांना सुटय़ा लागल्या. चाकरमान्यांना मात्र सुटी नाही. अशाच चाकरमान्यांची कार्यालयात जाण्याची वेळ आणि नेमका तेव्हाच पाऊस धो धो बरसला. जिथे आडोसा मिळेल तिथे तो शोधण्याचा प्रयत्न मंगळवारी नागपुरातील प्रत्येक रस्त्यांवर दिसून आला. 

गेल्या पाच-सहा दिवसांपासून दररोज सायंकाळी सातच्यानंतर बरसणाऱ्या वादळी पावसाने आज सकाळीच हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने पाऊस येईल हे नक्की होते, पण अचानक दुपारी बाराच्या सुमारास पाऊस जोरदार बरसला आणि बाहेर पडलेल्या नागपूरकरांची एकच धावपळ उडाली. पावसाची सुरुवातच मुसळधार झाल्याने आडोसा शोधेपर्यंत पावसाने प्रत्येकालाच चिंब भिजवले. नीरी, लक्ष्मीनगर यासारख्या शहरातल्या श्रीमंत समजल्या जाणाऱ्या वस्त्यांमधील रस्त्यांवरसुद्धा अचानक आलेल्या या पावसाने तुडूंब पाणी साचले. त्यामुळे एरवी पावसाळयात उघड होणारा महापालिकेचा चेहरा उन्हाळयातील पावसाने उघड केला. मुसळधार पावसामुळे समोरचे काहीही दिसत नसल्याने भर दिवसा चारचाकी आणि दुचाकी वाहनधारकांनी वाहनांचे दिवे लावले. त्यातही वाहने चालवणे कठीण झाल्याने कित्येकांनी झाडांचा तर मिळेल तो आडोसा शोधला. त्यामुळे अशा ठिकाणी दुचाकी वाहनांची गर्दी झालेली होती. शहरातल्या काही भागांमध्ये हलक्या गारांनीसुद्धा हजेरी लावली. एरवी पावसाळयात असा पाऊस पडला तर नागपूरकर फुटाळयावर जाऊन आनंद साजरा करतात, आज मात्र फुटाळयावर फारशी गर्दी दिसून आली नाही. पाच-सहा दिवसांपासून धुळीसह वादळी पावसाने हजेरी लावली, आज मात्र पाऊस मुसळधार असला तरीही वादळाचा तो आवेग नव्हता.
चाकरमान्यांना हा पाऊस नकोसा असला तरी बच्चेकंपनीच्या परीक्षा आटोपून शाळांना सुटय़ा लागल्याने त्यांनी या पावसाचा आनंद घेतला. पावसाचे हे सत्र आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याने नागरिकांना रेनकोट घेऊनच घराबाहेर पडावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2015 8:53 am

Web Title: heavy rain in nagpur
Next Stories
1 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मत-मतांतरे
2 ‘अटलबिहारी वाजपेयी विद्या संवर्धन योजना’ कागदावरच
3 ..तर मध्यवर्ती शाखेचा ताण, खर्च कमी होईल – मोहन जोशी
Just Now!
X