अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या, जखमींचा जीव वाचविण्याकरिता त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या व्यक्ती, संस्था समूह यांना गृहमंत्र्यांच्या रेसकोर्स निधीतून बक्षीस देण्यात येणार आहे. अपघाती जखमींना मदत केल्यास व्यक्ती, समूह, संस्था यांनी १ लाख ५० हजार रुपये प्रथम बक्षीस, १ लाख रुपये द्वितीय आणि तृतीय ५० हजार रुपये देण्यात येणार आहे.
अपघात झाल्यावर जखमी झालेली व्यक्ती बराच वेळपर्यंत त्याठिकाणी तशीच पडून राहते, पण तिच्या मदतीसाठी कोणीही समोर येत नाही. परिणामी जखमी व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू होतो. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात अपघात होतात. या अपघातात १२ ते १३ हजार नागरिकांना जीव गमवावा लागतो. तर ४० ते ४५ हजार नागरिक जखमी होतात. अपघातातील जखमींना लगेचच उपचार मिळाला नसल्याने अनेक जखमींचा मृत्यू होतो. त्यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होतात. ही बाब लक्षात घेता अपघातातील जखमी व्यक्तींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत करून उपचार लवकर मिळावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. यावर निर्णय होऊन ही बाब मान्य करण्यात आली आहे. या निर्णयानुसार रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या, जखमींचा जीव वाचविण्याकरिता त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या व्यक्ती, संस्था समूह यांना बक्षीस देण्यात येणार आहे.
जखमींना मदत केल्यास पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल म्हणून अनेक जण पुढे येत नाही. परंतु आता जखमींना मदत केल्यास संबंधित पोलीस ठाण्याला माहिती द्यावी. यात मदत करणाऱ्याला कोणताही त्रास होणार नाही, असे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी सांगितले. तसेच अपघातानंतर संबंधित पोलीस ठाण्याला किंवा नागपूर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना देत अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.