शिवसेनेने सुधाकर खराटे यांच्यापाठोपाठ बाळासाहेब जाधव यांनाही १४ महिन्यांतच जिल्हाप्रमुख पदावरून दूर करण्यात आले. जाधव यांच्या जागी दैठणा येथील डॉ. संजय कच्छवे यांची नियुक्ती झाली. लोकसभा व विधानसभा निवडणुकांपूर्वी जिल्ह्यात दोन्ही प्रमुखांना बदलून सेनेने बालेकिल्ल्याची डागडुजी करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.
परभणी व गंगाखेड विधानसभा मतदारसंघ जिल्हाप्रमुखपदाचा खराटे यांना जवळपास ३ वर्षांचा कार्यकाळ मिळाला. परंतु जाधव यांना केवळ १४ महिन्यांत हटविले. पाथरी व जिंतूर विधानसभा मतदारसंघांच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आता डॉ. कच्छवे यांच्याकडे सोपविली आहे. डॉ. कच्छवे यांनी २ वर्षांपूर्वी सेनेच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष म्हणून जि. प.ची निवडणूक लढवली होती. त्यानंतर कच्छवे यांचा शिवसेनेशी संबंध आल्यानंतर त्यांची उपजिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती झाली. फेरबदलात उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असलेले अजित वरपुडकर यांची जिल्हा समन्वयकपदी, तर उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे यांची पाथरी-जिंतूर विधानसभा प्रमुख या पदावर नियुक्ती झाली.
सेनेने पक्ष संघटनेत बदल करताना खराटे यांना जिल्हा समन्वयकपदी बढती दिली. जाधव यांना जिल्हाप्रमुखपदावरून दूर करताना पक्ष संघटनेत त्यांना कुठलेही स्थान दिले गेले नाही. नवनियुक्त जिल्हाप्रमुख संदीप भंडारी हे आमदार संजय जाधव, तर डॉ. कच्छवे हे आमदार मीरा रेंगे यांचे समर्थक आहेत. जिल्ह्यात दोन्ही आमदार समर्थकांना पक्षसंघटनेत महत्त्वाची पदे देऊन सेनेने समतोल राखला आहे.     हिंगोलीत सेनेतील
कलह चव्हाटय़ावर
वार्ताहर, हिंगोली
शिवसेनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेला कलह सर्वश्रुत असतानाच लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त पत्रकबाजीला उधाण आले आहे. मात्र, पक्षशिस्त मोडल्यास कारवाई करण्याचे अस्त्र जिल्हा संपर्कप्रमुख सुहास सामंत व जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी उगारले आहे.
जि.प. निवडणुकीनंतर जिल्ह्यात पक्षाचे खासदार सुभाष वानखेडे व माजी आमदार गजानन घुगे, डॉ. जयप्रकाश मुंदडा हे दोन गट कार्यरत झाल्याने जि.प.मध्ये सेनेची सत्ता असूनही तेथील कार्यपद्धतीवरून निर्माण झालेला वाद जिल्हाभर धुमसत राहिला.
आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीच्या पसंतीवरून सेनेत पत्रकबाजी सुरू झाल्याची चर्चा होती. मात्र, पत्रकबाजीची दखल घेत सेनेची शिस्त न पाळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबी जिल्हाप्रमुख बांगर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली.
शिवसेनेतील अंतर्गत बाबींसंदर्भात कुठल्याही स्थानिक पदाधिकारी अथवा शिवसनिकांनी प्रसिद्धिमाध्यमात मतप्रदर्शन करू नये, असे आदेश सामंत व बांगर यांनी दिले आहेत.