दक्षिणेतील मुसळधार पावसामुळे रेल्वेने गाडय़ा नागपूरमार्गे वळविल्या असून त्यातील भुकेल्या प्रवाशांनी इतवारी रेल्वे स्थानकावर दगडफेक करीत गोंधळ घातला. सोमवारच्या घटनेने रेल्वे प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली. 
दक्षिण भारतात विजयवाडा ते विशाखापट्टणम येथे मुसळधार पाऊस सुरू असून परिणामी रेल्वेने काही गाडय़ा नागपूरमार्गे वळविल्या. त्यामुळे येथील व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला. त्याचा फटका बिचाऱ्या प्रवाशांना बसला. हावडा-वास्को द गामा ही गाडी सोमवारी सकाळी कामठीला आली. पुढे गाडय़ा असल्याने तिला तेथेच थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे गाडीतील पाणीसाठा संपला. खाद्य पदार्थ आधीच संपले होते. त्यामुळे प्रवासी संतापले. अखेर सात तासानंतर ती निघाली. इतवारी रेल्वे स्थानकावर ती थांबली. तेथे तीन तास झाले तरी तिला सिग्नलच मिळाला नाही. येथेही आधीच खाद्य पदार्थ संपले होते. त्यातच काही गाडय़ा जात असल्याने प्रवाशांचा संयम सुटला. संतप्त प्रवाशांनी आधी हीच गाडी सोडा, असे म्हणत गोंधळ घातला. तिरुवेनल्ली-बिलासपूर ही गाडी तेथून जात होती. गाडीवर दगडफेक करून प्रवाशांनी गाडी थांबवली. रामटेक पॅसेंजरच्या इंजिनसमोर सिमेंटची फरशी ठेवण्याचा प्रयत्न काही प्रवाशांनी केला. त्या प्रयत्नात एका प्रवाशाचे बोट त्याखाली फसून तुटून पडले. त्याचा डावा हातही आधीच एका अपघातात कोपरापासून तुटला आहे.
प्रवाशांचा गोंधळ वाढलेला पाहून रेल्वे पोलिसांसह रेल्वे सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडी तेथे तैनात करावी लागली. अखेर दुपारी पावणेचार वाजता हावडा- वास्को द गामा गाडीला सिग्नल देऊन रवाना करण्यात आले. यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. इतवारी रेल्वे स्थानकावर अखेर बाहेरील विक्रेत्यांना बोलावून खाद्य पदार्थ विकण्यास सांगिण्यात आले.
रेल्वे प्रशासनाने सिकंदराबाद-गोहाटी, चेन्नई-हावडा, कन्याकुमारी-हावडा, यशवंतपूर-हावडा, व्हिल्लुपूरम- पुरुलिया, नांदेड-संबलपूर, यशवंतपूर-भागलपूर, अलेप्पी-टाटानगर, यशवंतपूर-हटिया, धनबाद-अलेप्पी, हावडा-चेन्नई, हावडा-यशवंतपूर, चेन्नई-आसनसोल, बंगलोर-भुवनेश्वर, हावडा-हैद्राबाद, संत्रागाची-चेन्नई, हावडा-चेन्नई, हावडा-वास्को द गामा, दिब्रुगड-यशवंतपूर, पुरी-ओखा आदी गाडी नागपूरमार्गे वळविल्या आहेत.